July 7, 2025
1000957732

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अहिल्यानगर)-

अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ नेते अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज, २ मे २०२५ रोजी दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते ६७ वर्षांचे होते.

नगर शहरात आणि परिसरात लोकप्रिय असलेले अरुणकाका यांचे समाजकारण व राजकारणातील योगदान लक्षणीय होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण अहिल्यानगरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांच्या राहत्या घरी, सारसनगर, भवानीनगर येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल, तर अंत्यसंस्कार दुपारी ४ वाजता अमरधाम स्मशानभूमीत, अहिल्यानगर येथे होतील.

अरुणकाकांच्या पश्चात पत्नी पार्वती, आमदार संग्राम जगताप, माजी जि.प. सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले व भानुदासजी कोतकर यांचे ते व्याही होते.

त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू झाली होती. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले, तसेच अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्षही राहिले. जिल्हा क्रिकेट संघटनेचे आणि गुणे आयुर्वेद शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!