
छत्रपती संभाजीनगर
विधानसभेपूर्वी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले राजू शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. यावेळी राजू शिंदे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांचे आभार मानले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजू शिंदे यांनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. संजय शिरसाट यांच्याविरुद्ध राजू शिंदे यांना औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली होती.
राजू शिंदे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे ( ठाकरे गट ) ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी प्रचंड नाराज झाले होते. उद्धव ठाकरेंनी खैरेंसह सर्वांची नाराजी दूर करत राजू शिंदे यांच्यासाठी कामाला लावले होते. पण, संजय शिरसाट यांच्यासमोर राजू शिंदे यांचा टिकाव लागू शकला नाही. राजू शिंदे यांचा 16 हजार मतांनी पराभव झाला होता.

त्यानंतर राजू शिंदे यांच्याकडून पुन्हा भाजपमध्ये जाण्यास हालचाली झाल्या होत्या. अलीकडे आग्रा येथे झालेल्या शिवजयंतीस राजू शिंदे यांनी उपस्थिती लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘रामराम’ केला असल्याचे बोलले जात आहे.
राजू शिंदे यांनी राजीनाम्याच्या पत्रात काय लिहिले?
प्रती, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब,
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्य.
विषय : माझा व माझे सर्व समर्थक, सहकारी यांचा राजीनामा देत आहेत तो स्विकारणे बाबत.
वरील विषय आपणास विनंती करतो की मी व माझे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहोत. मानणीय-उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री यांच्या व मा. अबांदासजी दानवे साहेब शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता व आपण हि माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली त्या बद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत.
परंतु मी काही कारणास्तव तसेच मा. खा. चंद्रकांत खैर साहेब यांच्या बद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्या सह शिवसेना पक्षाचा व विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो स्वीकारावा. मा. उद्धवजी ठाकरे साहेब व मा. अंबादासजी दानवे साहेब यांचे मनःपूर्वक आभार.