July 7, 2025
IMG_5544

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : पतीनेच मित्राच्या हवाली पत्‍नी केली. दोघांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर दोनदा बलात्‍कार केला. त्‍यानंतर पतीच्या मित्राची वाईट नजर तिच्या तरुण मुलीवर पडली. त्‍याने तिच्यासोबत लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्‍न केल्याची धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरात समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध शुक्रवारी (२८ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.
३४ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिला दोन मुली, एक मुलगा आहे. तिचे लग्न खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या जालन्याच्या युवकासोबत (सध्या वय ४०) ८ फेब्रुवारी २००७ मध्ये झाले होते. लग्‍नानंतर सहा- सात महिन्यांनी पती तिला घेऊन रांजणगाव शेणपुंजीत राहायला आला. दोघे किरायाने राहू लागले. त्‍यांना दोन मुली व एक मुलगा झाला. २०१७ मध्ये तिचा पती दक्षिण आफ्रिकेत बिझनेस करायला गेला. त्‍यामुळे महिला दोन मुली, एक मुलासह राहत होती. २०२० मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी तिच्या पतीने तिला बजाजनगरच्या एका सोसायटीत खोली करून दिली. तेथे वाहीद पठाण (वय ५०, रा. पंढरपूर, वाळूज एमआयडीसी) याच्याशी ओळख करून दिली. तो त्‍याचा चांगला मित्र असल्याचे सांगितले. वाहीद पठाण हा तिच्या शेजारीच बजाजनगरातील सोसायटीत राहत होता. २०२१ मध्ये घरी असताना वाहीद पठाण आणि तिचा पती घरी आले. पतीच्या सांगण्यावरून वाहिदने तिच्यावर बलात्‍कार केला. नंतर तिच्या पतीने जबरदस्ती शारीरिक संबंध केले. मुले झोपलेली होती. याबद्दल कोणाला काही सांगितले तर त्‍यांनी मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे.
काही दिवसांनी ती मोरे चौकातील एका सोसायटीत राहायला आली. तिथेही २०२३ मध्ये एकेदिवशी रात्री दोघांनी मिळून महिलेवर बलात्‍कार केला. २०२४ मध्ये एकेदिवशी वाहिद दुपारी तिच्या घरी आला. मोठ्या १७ वर्षीय मुलीच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. तिचे हात ओढून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. महिलेने त्‍याला रूमबाहेर ढकलून दिले आणि दार बंद करून घेतले. त्‍यानंतर महिला दोन्ही मुली आणि मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. त्‍यानंतरही पतीने तिला छत्रपती संभाजीनगरला चल म्‍हणून धमक्या दिल्या. मारहाण केली. त्‍यावेळी तिने बदनापूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली होती. आता तिने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून पती आणि वाहिदविरुद्ध तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक भाग्‍यश्री शिंदे यांनी महिलेचा जबाब नोंदवला.

……….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!