
वाळूज महानगर : बजाजनगरातील कोलगेट चौक परिसरात असलेल्या मनी प्लांट हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत हॉटेलचा अन्न व्यवसायाचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या पनीरच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील तपासणीत ते असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. पनीरमध्ये दुधातील फॅटचे प्रमाण कमी असून आरोग्यास घातक असलेल्या व्हेजिटेबल फॅटची भेसळ आढळून आली.
FDAच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत काही दिवसांपूर्वी मनी प्लांट हॉटेलची तपासणी करण्यात आली होती. यावेळी हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या पनीरचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी अहवालात पनीरमध्ये मिल्क फॅटचे प्रमाण कमी असल्याचे तसेच त्यामध्ये व्हेजिटेबल फॅट मिसळल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे पनीर अन्नसुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.
तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अस्वच्छता, किड्यांचा प्रादुर्भाव, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अहवाल उपलब्ध नसणे तसेच अन्न हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीच्या अहवालात त्रुटी आढळून आल्या.
या अनियमिततांबाबत FDAचे सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हॉटेल व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, निर्धारित मुदतीत नोटीसला उत्तर देण्यात आले नाही किंवा केलेल्या सुधारणांचा अहवालही FDAकडे सादर करण्यात आला नाही.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत FDAने मनी प्लांट हॉटेलचा अन्ननिर्मिती आणि ग्राहकांना अन्नसेवा देण्याचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. FDAची लेखी परवानगी मिळेपर्यंत हॉटेलमध्ये अन्नसेवा सुरू करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परवानगीशिवाय अन्नसेवा सुरू केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा FDAचे सहआयुक्त श्रीकांत करकले यांनी दिला आहे.
FDAच्या या कारवाईमुळे बजाजनगर परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्नाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
..
-
बजाजनगरातील मनी प्लांट हॉटेलवर FDAची मोठी कारवाई; पनीरमध्ये भेसळ आढळल्याने परवाना निलंबित
Share Total Views: 11 वाळूज महानगर : बजाजनगरातील कोलगेट चौक परिसरात असलेल्या मनी प्लांट हॉटेलवर
-
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वाळूजमध्ये रास्ता रोको
Share Total Views: 11 नगर-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज
-
नियमांचे उल्लंघन; वाळूजमधील पिझ्झा हटचा अन्न परवाना निलंबित
Share Total Views: 5,886 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे



