6c8d4688-213b-4db9-a592-81eae9348e44

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे) :

छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाययोजना करत रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत आणि नागार्जुन एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गावातील स्वच्छतेत सकारात्मक बदल दिसून येत असून, नागरिकांनाही मोठा दिलासा मिळत आहे.

ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई यांच्या पुढाकाराने प्रशासक अशोक घोडके, दीपक बडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तू भाऊ हिवाळे, कीर्तीकर, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ तसेच नागार्जुन ट्रस्टच्या संचालिका किरण बोराडे, संचालक साहिल तुरकर आणि किशोर म्हस्के यांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नागार्जुन स्वच्छता टीमने सलग १५ दिवस बेसलाइन सर्वेक्षण, जनजागृती आणि मॉनिटरिंग केले. गावातील कचरा साचणारी ठिकाणे निश्चित करून घंटागाडीच्या फेऱ्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, सुरुवातीला रस्त्यावर कचरा टाकण्याची सवय असलेल्या नागरिकांची समजूत काढत त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. औद्योगिक परिसरातील कामगारांना त्यांच्या सोयीच्या वेळेत घंटागाडी उपलब्ध करून दिल्याने रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.

नागरिकांच्या सवयी बदलणे हे सुरुवातीला मोठे आव्हान होते. मात्र, ग्रामपंचायतीने नागरिकांच्या अडचणी समजून घेत योग्य नियोजन केले. त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पूर्वी कचऱ्याचे ढीग दिसणाऱ्या ठिकाणी आता स्वच्छता दिसू लागली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ वातावरणाचा लाभ मिळत असून, कचरा व्यवस्थापनाची समस्याही कमी होण्यास मदत होत आहे. यापुढील टप्प्यात ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया आणि सुक्या कचऱ्याचे अधिकृत रिसायकलर्समार्फत व्यवस्थापन करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे.

या उपक्रमाबाबत ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई पाटील यांनी सांगितले की, नागरिकांची समजूत काढून त्यांच्या सोयीप्रमाणे घंटागाडीचे नियोजन केल्याने अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या सहकार्यामुळे कमी कालावधीत सकारात्मक बदल घडविणे शक्य झाले. दरम्यान, रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे वाळूज एमआयडीसी परिसरात कौतुक होत आहे. अशाच प्रकारचे नियोजनबद्ध स्वच्छता अभियान इतर ग्रामपंचायतींनीही राबवावे, जेणेकरून परिसरातील गावे स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

‘माझं रांजणगाव, स्वच्छ रांजणगाव, कचरामुक्त रांजणगाव!’ या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतून गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो, याचे उदाहरण ठरत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *