September 16, 2026

बजाजनगरातील जिवघेणा हल्यातील तीन आरोपी पोलसांकडून अटक; फायरिंगचाही झाला होता प्रयत्न

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : बजाजनगरमधील प्रमुख महाराणा प्रताप चौकात बुधवारी (२४ सप्टेंबर) रात्री सव्वा आठच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीतून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. इतकेच नव्हे तर पिस्तूलातून गोळी झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, घटनेनंतर तातडीने शोधमोहीम राबवत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पिस्तूलही जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत भोलानाथ शामराव कडमींचे (३२, रा. वडगाव (को.), मूळ रा. सिल्लोड) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भोलानाथ हा महाराणा प्रताप चौकातील मार्केट परिसरात उभा असताना काळ्या स्कॉर्पियोमधून तीन आरोपी हातात धारदार शस्त्रे घेऊन आले व त्याच्यावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, आरोपींपैकी एकाने पिस्तूल काढून मॅगझीन लोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पिस्तूलातील मॅगझीन आणि एक गोळी खाली पडल्याने फायरिंग होऊ शकले नाही आणि भोलानाथचे प्राण वाचले. ही घटना आर्थिक वादातून घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

हल्लेखोरांनी भोलानाथला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढला. घटनास्थळी पिस्तूलातील एक गोळी व मॅगझीन आढळल्याने वरिष्ठ पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, एमआयडीसी वालूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, एपीआय संजय गीते, पीएसआय शेख सलीम, प्रवीण पाथरकर यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू करून अखेर गुरुवारी (२५ सप्टेंबर) योगेश नंदू सांगळे (रा. गट क्र.६, वडगाव को.), सागर बारस्कर (रा. टीव्ही सेंटर हडको, छत्रपती संभाजीनगर) आणि राज संजय बर्फे (रा. पंढरपूर, वाळूज ल महानगर) यांना अटक केली. विशेष म्हणजे योगेश सांगळेवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!