
वाळूज महानगर | प्रतिनिधी
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वतःला पोलिसांशी जवळीक असल्याचे सांगत सामान्य नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या कथित ‘झिरो पोलिसां’चा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. तक्रारदारांना पोलिसांची व कायद्याची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका किरकोळ अपघातानंतर हा प्रकार उघडकीस आला. अपघातात एका दुचाकीस्वाराकडून चारचाकी वाहनाला धक्का लागला होता. चारचाकी वाहन धारक पोलिसांची भीती दाखवण्यासाठी मित्र ‘झिरो पोलीस’ ला सांगितले झिरो पोलिसाने संबंधित दुचाकीस्वाराकडे तब्बल एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित दुचाकीस्वार हा सामान्य कामगार असल्याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर अटक करू, पोलीस पाठवू, जामीन मिळू देणार नाही अशा धमक्या देत जवळपास आठ दिवस त्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, ९ जून रोजी एका महिलेसह चारचाकी वाहनधारकाने दुचाकीस्वाराच्या रांजनगाव शेणपुणजी येथे घरी जाऊन गोंधळ घातल्याचेही समोर आले आहे. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या काही तरुणांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, यातील एक तरुण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता त्याच्या नातेवाईकांना फोन करून अटक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रकरण मिटविण्याच्या नावाखाली संबंधितांकडून तब्बल ३८ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश्वर गाडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र, बाहेरगावी असल्याचे कारण देत त्यांनी पोलीस ठाण्यात हजर राहणे टाळल्याचे सांगितले जाते.
सामान्य नागरिक, कामगार आणि तक्रारदारांना कायद्याची पुरेशी माहिती नसल्याचा गैरफायदा घेत काही व्यक्ती पोलिसांशी संबंध असल्याचे भासवून दबाव टाकत असल्याची चर्चा परिसरात आहे. कोणत्याही प्रकरणाशी थेट संबंध नसताना हस्तक्षेप करून आर्थिक व्यवहार करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे नागरिकांचे मत आहे.
विशेष म्हणजे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिवसभर वावरणाऱ्या आणि स्वतःला पोलिसांचे निकटवर्तीय म्हणून सादर करणाऱ्या काही कथित ‘झिरो पोलिसां’कडून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक रमेश्वर गाडे यांनी स्पष्ट भूमिका मांडत, “आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे झिरो पोलीस नाहीत. पोलिसांच्या नावाचा वापर करून कोणी नागरिकांची फसवणूक करत असेल किंवा पैसे उकळत असेल तर संबंधितांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन केले आहे.
तसेच नागरिकांनी अशा व्यक्तींच्या दबावाला बळी न पडता थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. आता गोरगरीब कामगार व सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या या कथित झिरो पोलिस टोळीविरोधात पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

