
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे. आज दिनांक १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी यंदा एकूण ३६ मिरवणुकांना परवानगी देण्यात आली आहे.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ गाव तसेच मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत असून सुमारे पाच ते साडेपाच लाख लोकसंख्या आहे. या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका काढल्या जातात. मागील वर्षी एकूण ३८ मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
मात्र, गतवर्षी तिरंगा परिसरात मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद निर्माण होऊन गंभीर घटना घडली होती. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली असून मिरवणुका शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने काढण्याचे आवाहन केले आहे.
यंदा वडगाव कोल्हाटी (बजाजनगर), रांजणगाव शेणपुंजी, पंढरपूर आणि जोगेश्वरी या चार प्रमुख ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार असून प्रत्येकासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
तसेच, परिसरातील १८ ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी १३ अधिकारी ७० अंमलदार २० होमगार्ड असे एकूण १०३ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रत्येक मिरवणुकीसोबत एक पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे तसेच लेसर लाइट्स वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच, संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा धोका लक्षात घेऊन २२ जणांना तडीपार करण्यात आले आहे.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रस्त्यांवरील कचरा साफ करणे, अतिक्रमणे हटवणे तसेच वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी संबंधित विभागांना पोलीसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
॰॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
