
गादीत बांधून मृतदेह कन्नड घाटाकडे नेताना उघड; तिसगाव परिसरात खळबळ
प्रतिनिधी | वाळूज । संदीप लोखंडे
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रिक्षातून गादीत बांधलेले तरुणीचे शव कन्नड घाटाकडे नेत असताना पोलिसांनी दांपत्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत आईनेच आपल्या २१ वर्षीय मुलीचा खून केल्याची कबुली दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव नंदिनी राजू धिवरे (वय २१) असे आहे.

संशयातून उलगडला गुन्हा
शिवजयंतीमुळे रस्ते तुलनेने शांत असल्याचा फायदा घेत एक पुरुष व एक महिला रिक्षातून घरगुती सामानासह कन्नडकडे जात होते. मात्र रिक्षाचालकाला गादीत काहीतरी संशयास्पद असल्याची शंका आली. त्याने तत्काळ ओळखीच्या माजी अंमलदारास माहिती दिली. त्यानंतर डीबी पथकाला कळविण्यात आले.

डीबी पथकाने तिसगाव येथे रिक्षातून उतरवलेले सामान तपासले असता गादीत काहीतरी असल्याचा संशय बळावला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांना माहिती देऊन पंचनामा करण्यात आला असता गादीत एका तरुणीचे शव नियोजनबद्धरीत्या बांधलेल्या अवस्थेत आढळले.
सुरुवातीला गळफासाची बनावट कथा
पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित महिला व पुरुष यांनी ती त्यांची मुलगी असून तिने गळफास घेतल्याचे सांगितले. तसेच तिचे प्रेत मूळ गावी कन्नडकडे नेत असल्याचा दावा केला. तत्काळ घाटी रुग्णालयाशी संपर्क साधून ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तरुणी मृत असल्याचे घोषित केले.
आईची कबुली
पुढील सखोल चौकशीत मृत मुलीची आई भारती उमेश साबळे हिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या म्हणण्यानुसार, नंदिनीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वी पतीने तिला सोडून दिल्याने ती माहेरी आली होती. घरात वारंवार वाद होत होते. कुटुंब वडगाव कोल्हाटी येथे १५ दिवसांपूर्वी भाड्याने राहण्यासाठी आले होते.
गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजता रागाच्या भरात तिने मुलीला घरातील बाथरूममध्ये नेऊन प्लास्टिक पाईपच्या सहाय्याने गळा दाबून ठार मारल्याची कबुली दिली. मुलगी हालचाल करेनाशी झाल्यानंतर ती घाबरली. संध्याकाळी पती उमेश गोविंद साबळे घरी आल्यानंतर त्याला सर्व प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर दोघांनी मिळून मुलीचे शव गादीत बांधले. शिवजयंतीमुळे रस्ते शांत असल्याचा फायदा घेत कन्नड घाट परिसरात शवाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने ते निघाले होते.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
इनसाईड स्टोरी
भारती उमेश साबळे हिला पहिल्या पतीपासून नंदिनी ही मुलगी होती. उमेश गोविंद साबळे हे नंदिनीचे सावत्र वडील होते. ते वेल्डरचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. कुटुंबात सिद्धार्थ (१५), आदर्श (१२) अशी दोन मुले आणि सावत्र मुलगी नंदिनी असा परिवार होता.
समाजमन सुन्न करणारी घटना
प्रेमविवाह, कौटुंबिक वाद आणि संतापातून घडलेला हा प्रकार तिसगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला असून समाजमन सुन्न करणारा आहे.
॰॰॰॰
-
आषाढी एकादशीनिमित्त वाळूज-पंढरपूर परिसरात वाहतुकीचे विशेष नियोजन
Share Total Views: 570 २५ जुलैपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
-
भरधाव कारची उभी कंटेनरला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Share Total Views: 370 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील
-
राष्ट्रीय पॅरा तायक्वान्दोत रुद्र पांडेची कांस्यपदकावर मोहोर
Share Total Views: 853 पॅरा पुमसे प्रकारात महाराष्ट्रातून पदक जिंकणारा एकमेव खेळाडू न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:



