August 17, 2025
img_2599.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर –

अंबड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये १६ वर्षीय अविवाहित मुलगी प्रसूतीसाठी दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रकरण गंभीर स्वरूपाचे मानले जात असून, या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविवाहित मुलीची प्रसूती अंबड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये झाली. दरम्यान, तिचे नातेवाईक कोणतीही माहिती न देता हॉस्पिटलमधून निघून गेले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करून मुलगी व तिच्या नवजात बालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मुलगी अल्पवयीन असल्याने ही माहिती पोलिसांना देणे आवश्यक होते, मात्र नातेवाईकांनी ती लपविल्याचा पोलिसांचा आरोप आहे. अंबड पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडला असण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे.

सध्या मुलीकडून घटनेबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे.


error: Content is protected !!