August 17, 2025
img_2595.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : श्रद्धा आणि भक्तीने पवित्र केदारनाथ यात्रेला गेलेल्या वडगावच्या साईबन हौसिंग सोसायटीतील ३८ वर्षीय परमेश्वर भीमराव खवल यांचा अंगावर दरड कोसळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (दि.१६ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता घडली.

परमेश्वर खवल (रा. साईबन हौसिंग सोसायटी, वडगाव को.) हे मूळचे जालना जिल्ह्यातील परतूर येथील होते. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले खवल गेल्या आठ वर्षांपूर्वी वडगाव येथे रो-हाऊस घेऊन पत्नी, दोन मुली व आठ महिन्यांच्या मुलासह वास्तव्यास होते. सध्या त्यांनी घर भाड्याने देऊन बजाजनगरातील तारांगण हौसिंग सोसायटीमध्ये वास्तव्यास होते.

आई-वडिलांना यात्रेला नेण्याची त्यांची इच्छा होती, मात्र वयोमानामुळे ते तयार झाले नाहीत. अखेर परमेश्वर खवल यांनी एकटेच रेल्वेचे तिकीट काढून यात्रेला प्रस्थान केले.

गौरीकुंडहून सुमारे एक किलोमीटर उंचीवर पायी प्रवास करत असताना अचानक डोंगरातील एक प्रचंड दरड कोसळली आणि ते त्यात अडकले. स्थानिक यंत्रणेने मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती तेथील पोलिस अधिकारी अर्जुनसिंग यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी तत्काळ बजाजनगर येथील त्यांच्या राहत्या घरात भेट दिली. त्यावेळी घरात त्यांचे वृद्ध आई-वडील एकटेच होते. दोन मुली शाळेत गेल्या होत्या, तर पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी गेल्या होत्या. घरी मोबाइल असल्याने पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने मुलींना शाळेतून आणले आणि मोबाइल अनलॉक करून नातेवाईकांशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच परमेश्वर यांचे मोठे भाऊ विमानाने तातडीने केदारनाथकडे रवाना झाले आहेत.

बजाजनगर व वडगाव परिसरात या घटनेने शोककळा पसरली असून, “केदारनाथ यात्रेला गेलेल्या एका तरुण कर्त्या पित्याचा असा दुर्दैवी अंत होईल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत रहिवाशांनी शोक व्यक्त केला.


error: Content is protected !!