August 17, 2025
1b9fa3c1-c0be-462d-8672-20fd4f55dde3.jpg

वाळूज : देवच खरा आधार असून केवळ शरीराचाच नव्हे तर मन आणि बुद्धीचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख पूजनीय धनश्री दीदी यांनी केले. सिडको महानगर वाळूज येथे शनिवारी ९ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य रक्षाबंधन उत्सवात छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील हजारो स्वाध्याय परिवार उत्साहाने सहभागी झाला.

दीदी म्हणाल्या की, समाजात आज माणसाचे माणसाशी नाते घट्ट होणे गरजेचे आहे. जाती-धर्मापलीकडे प्रत्येकामध्ये देव आहे, ही भावना निर्माण झाली तर समाजातील बंध अधिक दृढ होतील. यावेळी त्यांचे मैदानावर ढोल-ताशांच्या गजरात आणि शंखनाद करून स्वागत करण्यात आले. त्यांनी वाहनातून संपूर्ण मैदान फेरी मारत उपस्थित परिवाराला भेट दिली आणि व्यासपीठावर भगवंत व दादांच्या प्रतिमेचे पूजन केले.

उत्सवात सुरुवातीला स्वाध्याय युवक-युवतींनी भावगीतावर नृत्य वंदना सादर करत राखीचा आकार साकारला. पावसात आणि चिखलातही ३५०० युवक व २००० युवतींनी तक्रार न करता तयारी करून सादरीकरण केले. मैदानावर टाकाऊ वस्तूपासून सजावट करण्यात आली होती. पाच आकर्षक प्रवेशद्वार, पार्किंगची व्यवस्था आणि सुरक्षेसाठी स्वाध्याय कृतिशील स्वयंसेवक कार्यरत होते.

मुंबईहून खास पारंपरिक पोशाखात आलेल्या स्वाध्याय कोळी बांधवांनीही नृत्यगीतावर ठेका धरला. गुरुवारी आणि उत्सवाच्या दिवशी झालेल्या पावसामुळे मैदान चिखलमय झाले असले तरी मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले. पाऊस आणि चिखलाची तमा न बाळगता आलेल्या स्वाध्याय परिवाराने मैदानावर मिळेल त्या जागेवर बसून मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद घेतला.


error: Content is protected !!