August 2, 2025
img_1512.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
छत्रपती संभाजीनगर | दि. २५ जुलै २०२५

वाळूज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्चून बांधले गेलेले रस्ते सध्या नद्यांचे स्वरूप धारण करत आहेत. सततच्या पावसामुळे आणि अपुरी नाले व्यवस्था यामुळे मुख्य रस्त्यांवर तब्बल दोन फूट पाणी साचले असून, परिणामी उद्योजक, कामगार तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः रांजणगाव फाटा ते एनआरबी चौक या मार्गावर पाण्याचा मोठा साठा झाल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच औद्योगिक परिसरातील १५ ते २० ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहनांची कोंडी, अपघात आणि उत्पादन प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक उद्योजकांचे म्हणणे आहे की, रस्त्याच्या कामात नियोजनाचा अभाव असून दोन्ही बाजूंनी नाल्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. काही पूर्वीचे नैसर्गिक नाले एमआयडीसीने बुजवून विकले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर साचून राहते आहे.

संबंधित अभियंत्यास याची माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आले, अशी नागरिकांची तक्रार असून संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ बदलण्याची मागणी केली जात आहे. परिस्थिती अद्याप नियंत्रणात न आल्यास, उद्योजकांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले आहे.

॰॰॰॰॰॰


error: Content is protected !!