July 20, 2025
2c516e6f-34df-4bae-868c-3c25caa79fe4-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

पंढरपूर, ता. छत्रपती संभाजीनगर | 17 जुलै 2025 – छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणामार्फत नगरनाका ते रहीमपूर नगर (पुणे रोड) या रस्त्याच्या नियोजित रुंदीकरणामध्ये पंढरपूर गावातील शेकडो घरं, व्यापारी आस्थापनं आणि धार्मिक स्थळे बाधित होणार असल्याने ग्रामपंचायत पंढरपूरच्या वतीने ग्रामसभा ठरावानुसार प्रखर विरोध व्यक्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काल (दि. 16 जुलै 2025) प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंनी 30 मीटर आणि 37 मीटर अंतरावर मार्किंग केली. त्यामुळे एकूण 74 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्किंगनुसार, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, जामा मस्जिद, मदिना मस्जिद, समाज मंदिर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांसारखी धार्मिक व सामाजिक महत्त्वाची स्थळे बाधित होणार आहेत. यासोबतच रस्त्यालगत असलेल्या अनेक रहिवासी व व्यावसायिक बांधकामांवर धोक्याचे सावट आले आहे.

ही बाब गंभीर असल्याने, ग्रामपंचायत पंढरपूरच्या वतीने सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेशमा अख्तर शेख, माजी पंचायत समिती सदस्य महेबुब चौधरी, माजी सरपंच अख्तर शेख व गौतम चोपडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त तथा आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण श्री. जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन निवेदन व ग्रामसभा ठराव सादर केला.

शिष्टमंडळाने प्रशासनासमोर वळण रस्ता किंवा उड्डाण पुल या पर्यायांची मांडणी केली. विभागीय आयुक्तांनी यावर समाधान व्यक्त करत, “सद्यस्थितीत कोणाचेही बांधकाम पाडले जाणार नाही” असे आश्वासन दिले. या सकारात्मक आश्वासनामुळे पंढरपूरमधील व्यापारी आणि नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता संयम पाळावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

ग्रामसभेच्या ठरावानुसार मागणी करण्यात आली की, नगरनाका ते रहीमपूर रस्ता जो सध्या अस्तित्वात आहे, तोच कायम ठेवण्यात यावा आणि नव्या रुंदीकरणामुळे गावातील मालमत्ता व धार्मिक स्थळे बाधित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

या शिष्टमंडळात सहभागी झालेले सदस्य:

सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेशमा अख्तर शेख, माजी पंचायत समिती सदस्य महेबुब चौधरी, माजी सरपंच अख्तर शेख, माजी सरपंच गौतम चोपडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत सदस्य के. व्ही. गायकवाड, जावेद शेख, शहेबाज चौधरी, समीर शहा, आमेर पठाण, तस्लीम शेख, आशा भोळे, मीरा गिरे, राजू उबाळे, विठ्ठल सोनवणे, गंगाधर खोतकर, शिवा गायकवाड, साबेर शहा, उदय देशमुख, मुखेश ठाकुर, निरज कुलकर्णी, श्रीराम जगदडे, अलीयान चाऊस, रोहित राऊत.

॰॰॰॰


error: Content is protected !!