

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा │ संदीप लोखंडे │ पंढरपूर, 17 जुलै 2025
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग मिळाल्यानंतर, पंढरपूर येथेही पुणे रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण हटवण्यासाठी ७४ मीटर (३७+३७) मार्किंग करण्यात आले. मात्र, ही मोहीम सुरू होताच स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध नोंदवत मोजणीची प्रक्रिया थांबवली. या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर ग्रामपंचायतीत तातडीची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत रस्ता रूंदीकरणाच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला.

आज सकाळी १० वाजता विठ्ठल-रुख्मिणी मंदिर कीर्तन मंडपात आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती वैशाली बालासाहेब राऊत होत्या. बैठकीत नगरनाका ते रेहिमपूर दरम्यानच्या रस्त्याच्या रूंदीकरणासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली.
व्यवसाय, घरे आणि धार्मिक स्थळांना धोका
महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या आराखड्यानुसार सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या ३० मीटर रूंद रस्त्याचे ७४ मीटरपर्यंत रूंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शेकडो रहिवासी व व्यावसायिक बांधकामे बाधित होणार आहेत. या भागात अनेक नागरिकांचे लहान-मोठे व्यवसाय असून, त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, जामा मशीद, मदीना मशीद, समाज मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा धार्मिक व सामाजिक स्थळांवरही रस्ता रूंदीकरणाचा धोका आहे.
अवैध ठरवत थेट तोडफोड?
१६ जुलै रोजी प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ३७ मीटर अंतरावर मार्किंग करून काही ठिकाणी बांधकामांवर तोडफोड केली. ग्रामस्थांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला. विशेष म्हणजे, सदरील बांधकामांना ग्रामपंचायतीने कर आकारणी केली असून, त्या मालमत्तांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बायपास वा उड्डाण पुलाचा पर्याय द्या – ग्रामस्थांची मागणी
ग्रामसभेत उपस्थितांनी एकमुखाने हा ठराव संमत केला की, रस्ता रूंदीकरण न करता पर्यायी मार्गांचा विचार करावा. एस क्लब ते बजाज गेट दरम्यान बायपास रस्ता किंवा ओएसिस चौक ते कामगार चौक दरम्यान उड्डाण पुलाची उभारणी करण्यात यावी. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईलच, शिवाय स्थानिकांचे व्यवसाय, घरे व धार्मिक स्थळे अबाधित राहतील.
सदरील ठरावात नमूद सूचना :
• सद्यस्थितीत ३० मीटरचा रस्ता पुरेसा असून त्यावर कोणतेही अतिक्रमण नाही.
• ३० ते ३७ मीटरच्या पुढील भागात वैध कर आकारणी असलेली बांधकामे आहेत.
• रस्ता रूंदीकरणामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता.
• शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन न करता बांधकामे हटवणे अन्यायकारक.
• धार्मिक स्थळे, सामाजिक सुविधा यांनाही धोका.
या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ठरावाचे सूचक शेख आख्तर शेख आरिफ आणि अनुमोदक केशव विश्वनाथ गायकवाड होते.
….
-
मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात; ८ मोबाईल, दुचाकीसह २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त..
Share Total Views: 15 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज महानगर ; एमआयडीसी
-
पंढरपूर ग्रामपंचायतीचा ठराव; रस्ता रुंदीकरणाच्या मार्किंगला तीव्र विरोध, आयुक्तांनी दिलं दिलासादायक आश्वासन
Share Total Views: 28 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) पंढरपूर, ता. छत्रपती संभाजीनगर | 17
-
पंढरपूर अतिक्रमण मोहिमेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; ग्रामसभेत रस्ता रूंदीकरणाच्या विरोधात ठराव
Share Total Views: 22 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा │ संदीप लोखंडे │ पंढरपूर, 17 जुलै 2025