July 21, 2025
1dc630b5-b966-47a4-89af-aae57945cc4c

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

वाळूज महानगर : वाळूज MIDC पोलीस ठाणे येथे दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.१० ते ८.०५ या वेळेत पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मंदिर प्रशासनाचे विश्वस्त व पुजारी यांची विशेष बैठक घेण्यात आली.

या बैठकीचे आयोजन मा. उच्च न्यायालयाच्या क्रिमिनल रिट पिटीशन क्र. 4729/2021 मधील मार्गदर्शक तत्वे व पोलीस महासंचालक कार्यालयाच्या दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजीच्या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते.

बैठकीत धार्मिक स्थळांवर बेकायदेशीररित्या लावण्यात येणारे लाऊडस्पीकर व भोंगे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही धार्मिक स्थळी शासनाच्या परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावणे किंवा भोंगे वाजवणे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लंघन ठरते, असे स्पष्ट करत पोलीस प्रशासनाने अशा यंत्रणा तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले.

महत्वाचे मुद्दे:

• वाळूज MIDC पोलीस ठाणे हद्दीत सर्व धर्मीय मिळून सुमारे २५० धार्मिक स्थळे आहेत.

कोणालाही भोंगे वापरण्याची वैध परवानगी नाही.

• ज्या संस्थांकडे परवानगी आहे, त्यांनाही रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे वाजवण्यास मनाई आहे.

लाऊडस्पीकरचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा अधिक नसावा, यावर भर देण्यात आला.

या बैठकीस एकूण ५५ पदाधिकारी, विश्वस्त व पुजारी उपस्थित होते. बैठक सौहार्दपूर्ण व शांततेत पार पडली.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईकेली जाणार आहे. त्यामुळे सर्व धार्मिक संस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे व सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहन करण्यात आले.

॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!