July 20, 2025
2453669f-9da2-4504-9ee7-072746feb263-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे

वाळूज महानगर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र चरण पादुकांचे भव्य दर्शन सोहळ्याचे आयोजन वाळूज महानगरातील बजाजनगर परिसरात मंगळवार, १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, प्लॉट नं. OX-19/1, जागृत हनुमान मंदिराच्या मागे RX सेक्टर, बजाजनगर येथे संपन्न होणार आहे.

दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पालखी पंढरपूर येथे नेण्यात येते आणि परतीच्या मार्गावर गेल्या २५ वर्षांपासून या पालखीचे आगमन वाळूजच्या बजाजनगर येथे होते. या वर्षीही या सोहळ्यात सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, भजन, पादुका पूजन, दर्शन, कीर्तन व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पार पडणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल अर्डक असतील. यावेळी पालखी व्यवस्थापक व राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. सुशील महाराज वणवे व त्यांचे सहकारी, तसेच पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, जीवन ज्योती सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, कमलनयन बजाज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज फर्नांडिस, श्री गुरुदेव सेवा मंडळ मराठवाडा प्रांत अधिकारी मनीष जैस्वाल, सरपंच सुनील काळे, उद्योजक हनुमंतराव भोंडवे, दशरथ मुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पवित्र कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ बजाजनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


error: Content is protected !!