December 1, 2025
img_0990-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे
वाळूज महानगर (गट क्र. ५२) : सिडको वाळूज महानगरातील गट क्रमांक ५२ मध्ये रस्त्यावर खुलेआम सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडको प्रशासनाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

परिसरात अनेक रहिवासी सोसायट्या, शाळा आणि व्यावसायिक दुकाने असल्याने येथे दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे पाण्याचे साचलेले डबके तयार होत असून त्यामुळे डास, माशा आणि इतर कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, अन्यथा सिडको कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात सिडको प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.


error: Content is protected !!