July 23, 2025
1b7a38d3-ab33-45d2-8e37-743e4ba71b0b-1.jpg

गंगापूर (अंबेलोहळ) | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा – संदीप लोखंडे

गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ गावात आईला मारहाण केल्याच्या रागातून सात जणांनी मिळून एका २३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना १२ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव अर्जुन रतन प्रधान असून तो आपल्या कुटुंबासह वाळूज येथे राहत होता.

या घटनेप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अतिशय वेगवान कारवाई करत अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना अटक केली असून, उर्वरित दोघांचा शोध सुरु आहे.

वाद उधारीच्या पैशावरून, आणि वादातून थेट खुनापर्यंत…

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ११ जुलै रोजी पांडुरंग वामन प्रधान याने अर्जुनला दिलेल्या उधारीच्या पैशावरून त्यांच्यात वाद झाला. वादादरम्यान अर्जुनने पांडुरंगच्या आईवर फडशीचा तुकडा फेकून मारल्याचा आरोप आहे. या घटनेचा राग मनात ठेवून पांडुरंग आणि त्याचे सहकारी यांनी अर्जुनवर हल्ला करण्याचा कट रचला.

त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पांडुरंग वामन प्रधान, अंकुश दिलीप प्रधान, अनिकेत संजय काकडे, अजय अशोक प्रधान, नंदकुमार अशोक बोराडे, विठ्ठल नामदेव प्रधान, आणि निलेश मच्छिंद्र प्रधान (सर्व रा. अंबेलोहळ, ता. गंगापूर) या सात जणांनी अर्जुनवर लाकडी दांडके आणि बांबूच्या सहाय्याने अमानुष हल्ला केला.

या हल्ल्यात अर्जुनला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच मृत्युमुखी पडला.

पाच आरोपींची अटक, दोन फरार

या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अर्जुनचा भाऊ करण प्रधान याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबेलोहळ गावातून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अनिकेत संजय काकडे आणि अजय अशोक प्रधान हे दोघे आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

पोलिसांची जलद आणि प्रभावी कारवाई

या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक आत्माराम बोराडे, तसेच अंमलदार बाळासाहेब आंधळे, राजेभाऊ कोल्हे, धीरज काबलीये, योगेश शेळके, विक्रम वाघ, नितीन इनामे, वैभव गायकवाड, लखन घुशिंगे, समाधान पाटील, हनुमंत ठोके, संतोष बंबनावत, किशोर साबळे, गजानन सोनूने आणि संदीप तागड यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

फरार आरोपी लवकरच अटकेत येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे अंबेलोहळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

••••


error: Content is protected !!