July 21, 2025
558a5be3-0acf-4d0f-ae40-0a58c15e30d8

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

गंगापूर (अंबेलोहळ) 12 जुलै ; गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ गावात एका २५ वर्षीय तरुणाची रस्त्याच्या कडेला अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करण रतन प्रधान यांनी दिलेल्या पोलिस जबाबानुसार, त्यांचा भाऊ अर्जुन प्रधान यास दिनांक 11 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास गावातील काही व्यक्तीनी मरे पर्यंत कपडे काढून गंभीर मारहाण करून ठार मारले.

करण प्रधान यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे, अर्जुन याला त्याच्या सावत्र काकाच्या उसन्या रकमेच्या मागणीवरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. अर्जुन याने फोनवरून करण यांना माहिती दिली होती की, त्याला पांडू प्रधान आणि त्याचे साथीदार मारहाण करत आहेत. त्यानंतर अर्जुनचा फोन बंद झाला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी करण प्रधान गावात पोहोचले असता चैतन्य बल्हाळ यांच्या दुकानासमोरील रोडवर अर्जुन प्रधान याचा अर्धनग्न व रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी लाकडी काठ्या, लिंबाच्या झाडाच्या ओली फांद्या, नारळाच्या झाडाचा फंटा, वायर व बेल्टचे तुकडे सापडले. हे पाहून त्यास अमानुषपणे मारहाण करून ठार मारल्याचे स्पष्ट झाले.

स्थानिक देविदास प्रधान, रुषीकेश उगले, संदीप प्रधान व मल्हारी दुधाट या साक्षीदारांनी ही संपूर्ण घटना पाहिल्याचे सांगितले असून त्यांनी भीतीपोटी आधी माहिती दिली नव्हती. त्यांच्या माहितीनुसार, अर्जुनला मारहाण करणाऱ्यांमध्ये पांडुरंग वामन प्रधान, अंकुश दिलीप प्रधान, अनिकेत संजय काकडे, अजय अशोक प्रधान, नंदकुमार बोहाडे, विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान यांचा समावेश आहे.

या घटनेमुळे अंबेलोहळ गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण प्रधान यांनी आपल्या जबाबात केली आहे.

॰॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!