July 21, 2025
bfad6678-2306-42d9-901b-6225e3d52895-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

छत्रपती संभाजीनगर | १० जुलै :

महावितरणच्या बजाजनगर कार्यालयातील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकाला केवळ फोन उचलला नाही म्हणून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात वडगाव ग्रामपंचायत सदस्य आणि शिंदे गटाचा कार्यकर्ता सागर शिंदे व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ९ जुलै रोजी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरण कर्मचारी वैभव ज्ञानेश्वर बनकर हे नियमित रात्रपाळीत काम करत असताना, सागर शिंदे व त्याचा सहकारी कार्यालयात आले. त्यांनी कर्मचाऱ्याला “फोन का उचलला नाहीस?” असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गळ्यात हात घालून दमदाटी करत जबरदस्तीने त्याला कार्यालयाबाहेर ओढून नेले आणि धक्काबुक्की केली.

या घटनेमुळे महावितरण अधिकारी प्रचंड घाबरला होता. त्याने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीविरोधात सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे, दमदाटी करणे आणि मारहाण या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकारामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

“नागरिकांच्या समस्यांसाठी आवश्यक असेल, तर गुन्हे अंगावर घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही!”
— सागर शिंदे

“बजाजनगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी सातत्याने आमच्याकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने आम्ही महावितरण कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलो होतो. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही समजतो, त्यामुळे त्याच भावनेतून हा पुढील प्रकार घडला. संबंधित कर्मचारी महावितरणचा असल्याची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती.”

॰॰॰॰


error: Content is protected !!