July 21, 2025
c645a2b8-67dd-41be-b54f-a8c4cc9facac-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

वाळूज महानगर , दि. १० जुलै :

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथील पिठाधीश गुरूमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री गुरुपौर्णिमेचा भव्य दिव्य उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.

या दिवशी तब्बल ८७३२ भाविक सेवेकऱ्यांनी गुरूपुजन करून गुरूपद स्वीकारले, तर परिसरातील हजारो भाविकांनी विविध उपक्रमांत सहभागी होत उत्सवाचे महत्त्व अधिक वृद्धिंगत केले. पहाटे ५ वाजता सामूहिक महाभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर सेवेकऱ्यांची गर्दी आणि भक्तिभावाने परिपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या “२०% अध्यात्म व ८०% समाजकार्य” या तत्त्वज्ञानाशी सुसंगतपणे मोफत सर्व रोग निदान शिबीर आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १५ तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने सेवा दिली. यामध्ये ८५० हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच १०७ सेवेकऱ्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली सेवा अर्पण केली. रक्तदानासाठी छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन बजाजनगर सेवा केंद्रातील युवा प्रबोधन प्रतिनिधी व समस्त सेवेकऱ्यांनी मोठ्या निष्ठेने पार पाडले.

श्री गुरु पौर्णिमेनिमित्त भाविकांची ही सेवा, श्रद्धा आणि समाजकार्याची एकत्रित अभिव्यक्ती म्हणजेच सेवा मार्गाची खरी ओळख ठरली.


error: Content is protected !!