July 7, 2025
img_0336-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –

छत्रपती संभाजीनगर, दि. ४ जुलै :

आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर (वाळूज) येथे १० ते १२ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व सुविधा युक्त वातावरण मिळावे, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

या अनुषंगाने झालेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीस पोलीस उपआयुक्त पंकज अतुलवार, वाळूज एमआयडीसी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे,  प्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार कुमठाळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभिनव बालुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश लड्डा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार योगेश शेळके, आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निर्देश :

• भाविकांसाठी विनासायास दर्शनाची व्यवस्था:

प्रत्येक भक्त व्हीआयपी समजून सेवा द्यावी. मंदीर परिसरात अनधिकृत विक्रेते टाळावेत. अन्न सुरक्षा विभागाने स्टॉल्सवर काटेकोर देखरेख ठेवावी.

• आरोग्य सेवांची तयारी:

आरोग्य विभागाने पूर्ण पथक तैनात ठेवावे, २४ तास ॲम्ब्युलन्स, डॉक्टर, नर्स उपलब्ध असाव्यात. रक्तदानासाठी भाविकांना प्रोत्साहन द्यावे.

• वीज आणि सुरक्षा व्यवस्था:

विद्युत विभागाने रहाट पाळणे व इतर विद्युत जोडण्यांना परवाने देताना काळजी घ्यावी. रात्रीची निगराणी अधिकाऱ्यांनी विशेष पथकांमार्फत करावी.

• गुन्हेगारीवर नियंत्रण:

अवैध मद्य विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष ठेवावे. पोलीस प्रशासनाने भाविक, महिला, बालकांची सुरक्षा अधिक महत्त्वाने घ्यावी.

• वाहतूक व्यवस्थापन:

महामार्गावर वाहतूक मार्गात बदल करून पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी. चोरी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करावेत. सीसीटीव्ही व ध्वनीप्रसार यंत्रणा कार्यान्वित कराव्यात.

• मार्गदर्शन व स्वच्छता:

मंदिर परिसरात स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असावा. हरवलेले व्यक्ती व बालकांसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी.

ए.एस. क्लब येथे वाहतुकीचे नियोजन, २४ तास मार्गदर्शक, दिशादर्शक फलकांची सोय असावी.

• महानगरपालिकेची भूमिका:

यात्रा काळात आणि नंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता केली जावी. फिरते सार्वजनिक शौचालय मोठ्या संख्येने उपलब्ध करावेत.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, “प्रत्येक भाविक हा आमच्यासाठी खास आहे. त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.”

oooo 


error: Content is protected !!