
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/ वाळूज महानगर
सायंकाळी बाजारासाठी दुचाकीवरून येणाऱ्या पती-पत्नीवर चौघांनी एकत्र येत कामगार चौकात अचानक हल्ला केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदि झळके, अक्षय झळके, कार्तिक भुकटे (सर्व रा. वळदगाव) व त्यांच्या एका अनोळखी मित्राविरोधात गंभीर स्वरूपाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी महिलेच्या दिलेल्या माहितीप्रमाणे, त्या आपल्या पती रितेश सोपान चाळक (रा. पाटोदा) यांच्यासोबत बाजारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत होत्या. त्यावेळी संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता अहिल्यानगर रोडवरील कामगार चौक येथे सिग्नल सुटल्यावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी चालकाने त्यांच्या गाडीसमोर आडवी गाडी लावली आणि वाद घालून शिवीगाळ केली.
विवाद वाढल्याने त्या दुचाकीवरील व्यक्तीने लाकडी दांड्याने रितेश यांच्या डोक्यावर व हातावर जोरदार मारहाण केली. त्यासोबत असलेल्या दुसऱ्या युवकाने फिर्यादी महिलेचा हात पकडून तिला गाडीतून खाली ओढून ढकलले आणि पायावर लाकडी दांडा मारला. याचदरम्यान पाठच्या एका गाडीवरील तीन युवक त्याठिकाणी आले. यामध्ये कार्तिक भुकटे नावाचा युवक देखील होता, ज्याने पतीला हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील हे योगायोगाने त्या ठिकाणी आले, मात्र तोपर्यंत सर्व आरोपी पळून गेले होते. या हल्ल्यात पती-पत्नी दोघांनाही दुखापत झाली असून, संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.