July 7, 2025
1001171519

14 वर्षीय मुलीचं बालविवाह पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल; गरीबीतून पोटासाठी घेतले कठोर पाऊल

न्यूज मराठवाडा । वाळूज महानगर प्रतिनिधी

    बालविवाह प्रतिबंधक कायद्याला आणि मुलींच्या संरक्षणाच्या हक्काला धक्का देणारी धक्कादायक घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. वय अवघं 14 वर्ष, अजून शाळेच्या पुस्तकांत रमायचं वय… पण या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिलं गेलं आणि आता ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झाल्यानं खळबळ उडाली आहे.

     ही धक्कादायक माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातून पुढे आली.  पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांनी सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी म्हणून या अल्पवयीन मुलीचे वडील, आई, सासू-सासरे आणि तिचा पती यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 काय घडलं नेमकं?

घाटी रुग्णालयातील तपासणीतून ही संपूर्ण घटना उघडकीस आली. दोन दिवसांपासून पोटदुखी व मळमळ झाल्याने संबंधित मुलगी उपचारासाठी आणली गेली.

सहायक पोलीस निरीक्षक सुषमा पवार यांनी मुलीचा जबाब नोंदवला. त्यात तिने कबूल केलं की, मागील महिन्यात रांजणगाव येथे तिचं लग्न लावण्यात आलं.

साखरपुडा आधीच झाला होता, आणि लग्नानंतर लगेचच पतीसोबत शारीरिक संबंध झाल्याने ती गर्भवती राहिली आहे, असं मुलीने स्पष्ट सांगितलं.

तिला बालकल्याण समिती व दामिनी पथकाच्या मदतीने एका बालगृहात ठेवण्यात आलं होतं.

🔍 वास्तविक कारण – आर्थिक ओढाताण

मुलीच्या जबाबात सांगितल्याप्रमाणे, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने पालकांनी लग्न लावून दिलं. पण अशा प्रकारे अल्पवयीन मुलीचं आयुष्य धोक्यात घालणं कायद्याने गुन्हा ठरतो.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेता व वय प्रमाणपत्र, वैद्यकीय अहवालांच्या आधारे गुन्हा सिद्ध होत आहे. या प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा व अन्य कलमांची अमलबजावणी होणार आहे.

–————————


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!