July 7, 2025
1000319838

न्यूज मराठवाडा नेटवर्क

नारायण गडावर दसरा मेळावा गाजवणारे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी लाखोंच्या उपस्थितीत त्यांनी ‘झुकायचं नाय’ असा सणसणीत हुंकार भरला.

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे यांनी संघर्षाचा नारा दिला. हा दसरा मेळावा मराठवाड्यात मोठ्या जोशात पार पडला. याचवेळी पंकजा मुंडे यांचा मेळावा भक्ती भगवान गडावर सुरू असल्यामुळे, दोन्ही मेळावे मराठवाड्यातील वातावरण तापवणारे ठरले.

मनोज जरांगेंनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय शिवराय” च्या घोषणेने केली. नारायण गडावर झालेल्या या भव्य मेळाव्यात सुमारे ५०० एकर परिसरात लाखो मराठा बांधव उपस्थित होते. या गर्दीने मनोज जरांगेंना मोठा आधार दिला. “आपल्या समाजाला कधी जातीवादात ओढले गेले नाही. आपण नेहमीच न्यायाची बाजू घेतली, पण अन्याय सहन केला नाही,” असे ते म्हणाले.

मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका

“जर अडवणूक झाली तर उठाव करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील उठाव केला होता, आपल्याला सुद्धा अन्यायाविरुद्ध लढा उभारावा लागणार आहे,” असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आमच्या समाजाने राज्याच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी खूप संघर्ष केला आहे. तलवारी हातात घेऊन लढलो, मान कापली गेली, पण कधीच हार मानली नाही,” असा संघर्षाचा इतिहास त्यांनी उभा केला.

दिल्ली झुकवणारा नारायण गड

मनोज जरांगे यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नारायण गडावरचा आशीर्वाद मिळाल्यावर दिल्लीला सुद्धा झुकवता येते. “या गडाच्या आशीर्वादाने दिल्लीवर दबाव निर्माण करता येतो. दिल्लीला जाऊन जे उलटले, त्यांना जनतेने उलटवलं,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. “जर अडवणूक झाली तर इच्छा नसतानाही उठाव करावा लागेल,” असेही त्यांनी ठासून सांगितले.

——–



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!