

✍️ गजानन राऊत
वृक्ष ही केवळ निसर्गाची शोभा नसून, मानवतेसाठी ऑक्सिजन देणारे जीवनदायी स्त्रोत आहेत, याची जाणीव पुन्हा एकदा मोटेगाव येथील निसर्गप्रेमींनी घडवून दिली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतातील पिकांना अडथळा ठरत असलेल्या सहा वर्षे वयाच्या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करून त्याला नवे जीवनदान देण्यात आले
शेतकरी आपल्या शेतातील वटवृक्ष काढण्याचा निर्णय घेत होता, परंतु सहा वर्षांपासून वाढवलेले झाड मरणार, ही कल्पनाच त्याला अस्वस्थ करत होती. ही माहिती शिवराई वृक्षबन कार्यरत असलेल्या निसर्गप्रेमी मल्लिकार्जुन हलकंचे यांना समजताच त्यांनी तत्काळ शेतकऱ्याची भेट घेतली. त्यांनी वडाचे झाड काढण्याऐवजी ते दुसरीकडे पुनर्रोपण करण्याचा सल्ला दिला.

मोटेगाव येथील महादेव मंदिर परिसरातील चार एकर क्षेत्रात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या शिवराई वृक्षबन या उपक्रमाअंतर्गत त्या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले. या कार्यात मल्लिकार्जुन हलकंचे यांच्या मार्गदर्शनाखाली वनश्री शिवाजी राऊत, शंकर पवार, गोविंद सरवदे, संदीप शेंडगे, गोपाळ पवार आदींनी परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे गावात वृक्षसंवर्धनाची नवी चेतना निर्माण झाली असून, निसर्गाशी मैत्री जपणाऱ्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडासारख्या पवित्र वृक्षाला जीवनदान देऊन निसर्गसंवर्धनाचा आदर्श उभा करणाऱ्या या घटनेतून अन्य गावांनीही प्रेरणा घ्यावी, अशी भावना व्यक्त होत आहे.