July 7, 2025
images (8)

नर्स तरुणीचा विनयभंग व पाठलाग : आरोपीवर गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा । वाळूज प्रतिनिधी : अनिकेत घोडके

सिडको वाळूज महानगर परिसरात नाईट ड्युटी करून घरी परतणाऱ्या एका नर्स तरुणीचा विनयभंग व पाठलाग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५ जून) रोजी घडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीच्या शोधाला सुरुवात केली आहे.

पीडित २१ वर्षीय नर्स तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती नेहमीप्रमाणे नाईट ड्युटी करून सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास रिक्षा पकडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच वेळी चंद्रकांत शिंदे नावाच्या तरुणाने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने धाडस दाखवत जोरात आरडाओरड केली, त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला.

मात्र, ही घटना इथच थांबली नाही. दुसऱ्या दिवशीही (२६ जून) संबंधित तरुणाने पीडितेचा पाठलाग केला. त्यामुळे घाबरलेल्या नर्स तरुणीने अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपबिती सांगितली.

पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत चंद्रकांत शिंदे याच्याविरोधात विनयभंग, स्त्रीचा पाठलाग आणि अश्लील वर्तन या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त करणारी आहे. विशेषतः रात्री काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी अधिक चोख सुरक्षा व्यवस्था असणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!