July 7, 2025
img_0127-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे

वाळूज महानगर, (२८ जून ) –
बजाजनगर भागात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दीर्घ आजाराने त्रस्त झालेल्या ३४ वर्षीय अनिल बन्सीलाल चिंचोले या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चिंचोले यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील उंदरी असून सध्या ते वाळूजमधील बजाजनगर परिसरातील जागृत हनुमान मंदिरासमोर असलेल्या कृष्णामाई सोसायटीत कुटुंबासोबत वास्तव्यास होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून आजाराचा त्रास होत होता, त्यामुळे ते मानसिक तणावात होते.

घटनेच्या दिवशी त्यांच्या पत्नी कामानिमित्त खाजगी रुग्णालयात गेल्या होत्या. घरी अनिल, त्यांचा १० वर्षांचा मुलगा असे दोघेजण होते. सकाळी मुलगा उठल्यानंतर त्याने वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि तातडीने आईला फोन करून माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी घाटी रुग्णालयात पाठवला. सदर प्रकरणी पुढील तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत.


error: Content is protected !!