July 7, 2025
Screenshot_20250627_194245

आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरू; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( न्यूज मराठवाडा ब्युरो )

शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्या अतिशय विश्वासू ड्रायव्हरच्या नावे जवळपास 150 कोटींची जमीन असल्याचे उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यानंतर राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

● ड्रायव्हरच्या नावे शंभर कोटींच्या वरची मालमत्ता!

जावेद रसुल असे या ड्रायव्हरचे नाव असून, तो गेल्या अनेक वर्षांपासून खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबत कार्यरत आहे. हैदराबाद येथील ‘सालारजंग’ कुटुंबाच्या वंशजाने ही जमीन हिबानामा (गिफ्ट डीड) द्वारे जावेद रसुलच्या नावावर केल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात नमूद आहे. या जमिनीची किंमत सध्या बाजारभावानुसार 150 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

● आर्थिक गुन्हे शाखेने घेतला तपास हाती

या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील एका वकिलाने अधिकृत तक्रार दाखल केल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने या व्यवहाराची सखोल चौकशी सुरू केली आहे. एवढ्या मोठ्या मूल्याची मालमत्ता एखाद्या खासदाराच्या ड्रायव्हरकडे कोणत्या आधारावर आली? त्यामागे मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहार की इतर काही? – हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

● भुमरे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढणार?

संदीपान भुमरे हे सध्या लोकसभेचे सदस्य आहेत तर त्यांचे पुत्र विलास भुमरे हे पैठणचे आमदार आहेत. या जमिनीच्या प्रकरणामुळे भुमरे पिता-पुत्र अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. जमीन खरेदी-विक्री किंवा हिबानामा व्यवहारामागे कोणाचा हस्तक्षेप आहे? हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

● विरोधकांचा हल्ला सुरू, ‘फक्त ड्रायव्हर का?’ असा सवाल

या प्रकरणानंतर विरोधकांनी भुमरे कुटुंबावर टिकेचा भडीमार सुरू केला असून, “सामान्य ड्रायव्हरच्या नावे इतकी मालमत्ता कशी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. हा प्रकार म्हणजे ‘बेनामी संपत्ती लपवण्याचा प्रकार’ असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!