July 7, 2025
img_0125-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर : शहरात खळबळ उडवणाऱ्या एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणात एक कोट्याधीश ड्रग्स तस्कर उघड झाला असून, त्याचे नाव बबन खान उर्फ शरफोद्दीन खान आहे. २१ जून रोजी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत जवळपास २.५ किलो एमडी ड्रग्ससह तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे वाळूज एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला असून, यामागे आर्थिक आणि राजकीय बळकटी असलेले जाळं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कोण आहे ‘बबन खान’?

मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला बबन खान सध्या छत्रपती संभाजीनगरातील सिटी चौक भागात वास्तव्यास आहे. त्याचे औद्योगिक भागात तब्बल १५ एकरमध्ये पसरलेले दोन गोदाम आहेत. विशेष म्हणजे एका मोठ्या फार्मा कंपनीचा स्क्रॅप उचलण्याचा ठेका त्याच्याकडे आहे, आणि याच स्क्रॅपच्या आडून एमडी ड्रग्सची अवैध तस्करी केली जात होती.

तस्करीची क्लिष्ट यंत्रणा

रात्रीच्या अंधारात, २ ते ४ या वेळेत स्क्रॅप ट्रकमधून कंपनीचा उरलेला “पावडर” बबन खानच्या गोदामात आणला जात असे. यासाठी खास ट्रक वापरले जात, वजनकाटाही बबन खानचाच असल्याचे बोलले जात आहे. ट्रक कंपनीतून भरला जात, पुन्हा वजन केला जाई आणि तोच ट्रक बबनच्या गोदामात पोहचत असे. त्या पावडरची पुढील प्रक्रिया गुप्तपणे केली जाई आणि मोठ्या प्रमाणावर ती ड्रग्स स्वरूपात इतर राज्यात पाठवली जात होती.

‘उप्पर तक बात कर लेंगे’ – दबदबा आणि वट

धाड टाकल्यानंतर बबन खानने पोलिसांना दिलेलं उत्तर – “हम उप्पर बात कर लेंगे”, यावरूनच त्याचा वरपर्यंतचा दबदबा स्पष्ट होतो. अटकेनंतर त्याला वाळूज पोलीस ठाण्यात वीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. पंख्याच्या थंडीत भोजन मिळाल्याचा प्रकार बाहेर आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली. या प्रकाराची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ तीन पोलिसांना निलंबित केले.

तपासाची सूत्रं गुन्हे शाखेकडे

या प्रकरणाचा तपास आता शहर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून, बबन खानची चौकशी वाळूजमधीलच नामांकित फार्मा कंपनी ‘मायलन’ मध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणात कंपनीतील अधिकाऱ्यांची भूमिका आणि माहितीही तपासली जात आहे.

कनेक्शन कुठपर्यंत?

छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि गुजरातपर्यंत या रॅकेटचे जाळे पसरले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर यात राजकीय हस्तक्षेप, कमानीचा रोल, आर्थिक घोटाळे हे सर्व तपासाअंती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांची नजर वाळूज औद्योगिक परिसरात अशाच प्रकारे सुरू असलेल्या इतर गोदामांवरही आहे.

हा प्रकरण केवळ एक ड्रग्ज रॅकेट नसून, एक संपूर्ण सिस्टिम, भ्रष्ट यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर उभा केलेला गुन्हेगारीचा किल्ला आहे. ‘बबन खान’ हे केवळ सुरुवात असू शकते, पुढे अजून बरेच नावे उघड होण्याची शक्यता आहे.


error: Content is protected !!