July 7, 2025
bf33735a-58c6-4f2e-b554-7313c4c869e9-1.jpg

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे )

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ११ जून २०२५ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुसूचित जातीतील नागरिकांचा अवमान करत “हरिजन” असा शब्द वापरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्येच या शब्दप्रयोगावर बंदी घातली असूनही त्याकडे दुर्लक्ष करून वापर झाल्याने समाजामध्ये तीव्र रोष पसरला आहे.

या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे प्रकाश निकम, अॅड. सावते, रमेश दाभाडे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, १ जुलै २०२५ रोजी वाळूज येथील तिरंगा चौक ते पंढरपूर रस्त्यावर भव्य रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग

या आंदोलनात महिला, पुरुष, लहान मुले, तृतीयपंथीय तसेच वाळूज परिसरातील सर्व आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. लोकवर्गणीतून रस्ता रोको आयोजित करण्यात आला असून, स्टेज उभारून सामाजिक गीतांचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे. सकाळी ११.३० ते १२ या वेळेत रस्ता रोको करण्यात येईल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

जलील यांच्यावर रोष का?

• आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या – निवडणुकीत समाजाच्या पाठींब्यावर निवडून आलेल्या व्यक्तीने समाजविरोधी वक्तव्य करून विश्वासघात केला, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

• पूर्वीही आक्षेपार्ह वक्तव्य – अनुसूचित जातीतील उद्योजकांवर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप याआधीही झाला होता.

• अद्याप अटक नाही – अनेक मोर्चे, तक्रारी करूनही अद्याप इम्तियाज जलील यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.

आंदोलनात उपस्थित मान्यवर

के व्ही गायकवाड, नामदेव सावंत, काकाभाऊ  कोळशसे, भीमराव मोर, रमेश दाभाडे, प्रकाश निकम, सुखदेव सोनवणे, भीमराव मोर, सोमनाथ महापूर, रामदास बर्फे, अशोक सुकधन, दिपक सदावर्ते, सुखदेव सोनवणे ज्ञानेश्वर जाधव, चेतन सोनवणे, अरुण पठारे, नामदेव केदारे, आनंद खरात, सतीश महापुरे, बाबासाहेब वक्ते, कृष्णा सदावर्ते, पाईकराव भौधाचार्य, अशोक निकम, बाळू शेरे, सूर्यकांत पठारे, सुदंध दाभाडे आदींची आंदोलनात उपस्थिती राहणार आहे.

मंत्री सिरसाठ यांचा काही संबंध नाही-

हे आंदोलन मंत्री सिरसाठ यांच्या समर्थनार्थ नसून, फक्त इम्तियाज जलील यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्यामुळे आयोजित करण्यात आले आहे.

या रस्ता रोको आंदोलनाद्वारे संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले जाणार असून, इम्तियाज जलील यांच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही, असा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला आहे.


error: Content is protected !!