December 1, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा । प्रतिनिधी : संदीप लोखंडे

छत्रपती संभाजीनगर (वाळूज महानगर ) |अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे गोदावरी दूध घेऊन येणाऱ्या वाहतुकीच्या गाडीला भरधाव आयशर ट्रकने जबर धडक दिल्याची घटना एएस क्लब चौकात घडली. ही अपघाताची घटना २२ जूनच्या पहाटे सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली असून, या दुर्घटनेत दूध पुरवठा करणाऱ्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे हजारो लिटर दूध रस्त्यावर सांडल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक राजेंद्र कडूबा दाभाडे आणि विश्वास शिवाजी पवार हे दोघे कोपरगाव येथून गोदावरी दूध घेऊन एमएच १७ बीवाय ७२२६ या क्रमांकाच्या गाडीने छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. एएस क्लब चौकाजवळ पोहोचताच, संभाजीनगरकडून वाळूजकडे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक (एमएच २८ बीबी ५४३०) ने दुभाजक ओलांडत त्यांच्या गाडीला समोरून जबर धडक दिली.

या अपघातात दूध वाहतूक करणाऱ्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, गाडीत असलेल्या सुमारे ४०० कॅरेट्समधील दूध बॅग फुटल्यामुळे हजारो लिटर दूध वाया गेले. चालकांच्या अंदाजानुसार या दुर्घटनेत अंदाजे २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सुहास मुंढे आणि गजानन सोनुने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कार्यवाही सुरू केली. त्यांनी आयशर ट्रकचा चालक रामगोपाल अशोक मोठे (वय ३०) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार केशव चौथ हे करीत आहेत.


error: Content is protected !!