July 7, 2025
IMG_9600

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): संदीप लोखंडे –
तिसगाव खावडा परिसरात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पथकाला जागा सफाटीकरणासाठी गेले असता स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध पाहायला मिळाला. ही जागा सध्या बौधिसत्व ध्यानसाधना संस्थेच्या ताब्यात असून, येथे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र, महापालिकेने ती जागा घरकुल योजनेसाठी आरक्षित करत सफाटीकरणासाठी एका खासगी संस्थेला कंत्राट दिल्याने वादाला तोंड फुटले.

महापालिकेच्या आदेशानुसार जेसीबीच्या साहाय्याने सफाटीकरणाचे काम सुरू असताना झाडांची तोड सुरू करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली. संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या पथकाला घेराव घालत काम बंद पाडले. या घटनेत महापालिकेचे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये बाचाबाची व किरकोळ धक्काबुक्कीही झाली. परिणामी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेश ठाकरे, पोलीस अंमलदार कल्याण खामकर, अरुण उगले आणि आबासाहेब फलके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांमध्ये समेट साधला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली असून, जर कारवाई न झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. यावेळी याचिकाकर्ते अरुण पठारे, सुनील जोगदंडे, शशिकांत गोफणे, अशोक त्रिभुवन, रॉबिन कसबे, रमेश दाभाडे, प्रकाश निकम, सुखदेव सोनवणे, सूर्यकांत पठारे, चेतन सोनवणे, कृष्णा साळवे, नामदेव सावंत, सोमिनाथ महापुरे, अनिल थोरात, विक्रम ढेरे, सिद्धार्थ पैठणे, रजनीकांत त्रिभुवन, उमेश महापुरे, रतन मोरे, नरेंद्र त्रिभुवन, अशोक कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

वादनानंतर गृहप्रकल्प अधिकाऱ्यांची धाव

या वादानंतर ग्रह प्रकल्प योजनेचे अधिकारी अर्जुन खापाळे व विकास मुंडे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. पुढील कारवाई शांततेत पार पडावी यासाठी अधिकाऱ्यांनी लवकरच नागरिकांसोबत बैठक घेऊन जागा हस्तांतरणासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!