

छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा ब्युरो
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत बौद्ध समाजाबाबत अवमानकारक आणि असंवैधानिक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अद्याप त्यांना अटक न झाल्याने संतप्त आंबेडकरी अनुयायांकडून उद्या सोमवार, २३ जून रोजी ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
हा भव्य मोर्चा सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून निघणार असून, सील्लेखाना, गुलमंडी मार्गे पुढे भडकल गेट येथे समारोप होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात हजारो भीमसैनिक सहभागी होणार आहेत.
समितीकडून शहरातील बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊन, बुद्ध विहारांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. पोलिसांनी अद्यापही जलील यांना अटक न केल्यामुळे रोष वाढला असून ‘लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा’ असे आवाहन कृती समितीने केले आहे.
या मोर्चाच्या निमित्ताने संभाजीनगरात मोठा राजकीय आणि सामाजिक खदखद उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.