July 7, 2025
01--5

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगरात सायलेन्सर काढून किंवा बदलून बुलेट मोटारसायकलचा जोरजोरात आवाज करणाऱ्या तरुणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाळूज महानगर, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेपू, जोगेश्वरी, वाळूजच्या मुख्य रस्त्यांवरून भरधाव वेगाने बुलेट चालवणारे हे तरुण ‘धडधड’ आवाज करत निघतात, त्यामुळे शाळा, हॉस्पिटल, तसेच घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. सध्या शाळा सुरू झाल्याने दिवसा व संध्याकाळच्या वेळेस अशा ध्वनीप्रदूषणामुळे लहान मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत आहे.

विशेषतः मुख्य रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा टवाळखोरांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वीही पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी अशाच प्रकारच्या बुलेट सायलेन्सर प्रकरणात कारवाई करून दंडात्मक कारवाई केली होती. ‘’ज्याप्रमाणे मागे कारवाई झाली होती, त्याच धर्तीवर आता पुन्हा कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी या तरुणांच्या बुलेट जप्त करून त्यांना कठोर दंड लावावा,” अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत. वाळूज वाहतूक शाखेसह वाळूज व एमआयडीसी पोलिस ठाणे या गंभीर ध्वनीप्रदूषणाकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा सखोल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!