July 7, 2025
f19a7d75-9bd5-4a32-a397-ea208b55c1b7

न्यूज मराठवाडा प्रतिनिधी – संदीप लोखंडे
वाळूज महानगर | १० जून २०२५

वाळूज महानगरमध्ये वटपौर्णिमेनिमित्त विवाहित महिलांनी पारंपरिक व धार्मिक उत्साहात व्रत पूजनाचा कार्यक्रम साजरा केला. बजाजनगर, वाडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेपू, कमलापूर,वाळूज, जोगेश्वरी,तिसगाव विविध गावामध्ये, कॉलनी, सोसायट्या आणि प्रभागांमध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या झाडाची पूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले.

सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक नटूनथटून वडाच्या झाडाभोवती फुले, कुंकू, अक्षता व धुपदीपाने पूजा करत वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घातल्या. अनेक महिलांनी गजरे, हिरव्या साड्या आणि पारंपरिक दागिने परिधान करून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. काही ठिकाणी सामूहिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचा प्राण यमराजाकडून मागून परत आणला, या पौराणिक कथेनुसार वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रतपर दिवस मोठ्या श्रद्धेने पाळतात.

या पूजनानंतर महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावून सौभाग्यवती भवःच्या शुभेच्छा दिल्या. अनेक महिलांनी गोडधोड पदार्थांचे वाटप करून हा सांस्कृतिक उत्सव साजरा केला.

या उत्सवामुळे वाळूज परिसरात उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!