July 7, 2025
50a404ed-e32d-4659-9f10-05d250fd13f2

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : मिठाई आणण्यासाठी बुलेटवर निघालेल्या उद्योजकाच्या मुलाला भरधाव वेगात येणाऱ्या टाटा पंच इव्ही कारने जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतरही मदत करण्याऐवजी कारमधील चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी संबंधित चौघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उद्योजक निलेश कुंदे यांचा मुलगा ओम कुंदे (वय २१, रा. ग्रोध सेंटर, सिडको महानगर-०१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ६ जून २०२५ रोजी सकाळी ५.३० वा. सुमारास ते मिठाई आणण्यासाठी बुलेट (MH20HE3461) वरुन जात होते. सिडको एरिया, MSCB ऑफिसजवळ चेतन बिर्याणीसमोरील मुख्य रस्त्यावरून जाताना कॅफे इलेव्हनकडून आलेल्या भरधाव टाटा पंच EV (MH20GV4919) या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.


धडकेनंतर कुंदे कारच्या बोनेटवर आदळून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. अपघातात त्यांच्या डोक्याला, कपाळाला, डोळ्याजवळ, पाठीला व हातपायांना गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर कारमधून उतरलेल्या चौघांनी – ज्यात एक १६ वर्षीय मुलगा लोकेश मुथा कार चालवत होता त्याने मदतीऐवजी कुंदे यांना मारहाण केली.
यावेळी अपघाताचे साक्षीदार ऋषि पोपळे यांनी हस्तक्षेप करताच त्यालाही मारहाण करण्यात आली. गर्दी जमू लागल्याने आरोपींनी कारमधील बिअरच्या बाटल्यासह पळ काढला. जखमी कुंदे यांना रुतिक बनकर व बंटी कांदे या दोघांनी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.


या घटनेबाबत ओम कुंदे यांनी कारचालक लोकेश मुथा व इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध अपघात, मारहाण आणि मदत न करण्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली असून संबंधित कारही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान सर्व उद्योजकांनी पंचनामा करण्या साठी आलेल्या पोलिसांसमक्ष तक्रारींचा पाढाच वाचला आणि परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कॅफे मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करावी नसता आम्ही ते बंद करू असा इशारा दिला.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!