April 3, 2025
f10c3469-f5d4-48cb-b3db-111bd1396d9a

न्यूज मराठवाडा वृत्तीवा ( संदीप लोखंडे ) –

वडगाव कोल्हाटी येथे धुलिवंदन सणादिवशी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सद्यस्थितीत जखमींवर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत.
याविषयी कल्याण अंबरनाथ वाव्हुळे रा. वडगाव कोल्हाटी यांनी तक्रार दिली की, १४ मार्च रोजी दुपारी १२.०० ते १२.३० वाजेच्या सुमारास, गावातील सचिन प्रधान, अजय प्रधान, गणेश सोमासे आणि अमोल दळवी हे माझ्या घरासमोर येऊन त्यांनी मुलगा करण वाव्हुळे (वय २२) याला बाहेर बोलावून घेत जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी त्यांची पत्नी मंगल वाव्हुळे आणि मुलगी अमृता खंडागळे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत करणच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच सचिन प्रधान, अजय प्रधान, गणेश सोमासे व अमोल दळवी यांनी करणचा मित्र नितीन कल्याण साळे यालाही मोटरसायकलला धक्का देऊन खाली पाडले आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत नितीनच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सानप हे करीत आहेत.
तर दुसर्‍या गटातील गौरव दत्तू प्रधान यांनी तक्रार दिली की, ज्ञानेश्वर दगडू साळे, परमेश्वर दगडू साळे, नितीन कल्याण साळे आणि करण कल्याण वाव्हुळे १४ मार्च रोजी दुपारी १२.०० ते १२.२० च्या दरम्यान, वरील सर्व आरोपींनी संगणमत करून गौरव प्रधान यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याच्यावर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले तसेच लाकडी दांड्याने मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली असून, ते सर्व या मारहाणीत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बजाजनगरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. प्रधान यांच्या फिर्यादीवरू वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक काकड तपास करत आहेत. दोन्ही गटांचे आरोप परस्परविरोधी असून, पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करून सखोल तपास सुरू आहे.
गावात तणावाचे वातावरण
या घटनेमुळे वडगाव कोल्हाटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!