July 7, 2025
c494b58b-1449-4236-a581-04cbf5af79fd

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी
आज राज्यात जातीची आणि मातीची खदखद आहे. असे विदारक चित्र असतानाही राज्यातील तरुण कवी, लेखक नव्या दिशेने लिहीत आहेत. मराठी साहित्य संमेलन या मातीशी, संस्कृतीशी जुळलेले आहे. ही संस्कृती आणि माती मजबूत करण्याचे काम, मराठवाड्याला दिशा देण्याचे काम मराठवाडा साहित्य संमेलन सातत्याने करत आलेले असल्याचे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काढले.
बजाज नगरातील विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित ४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवार १६ रोजी थाटात करण्यात आला. यावेळी समारोप कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संमेलन स्वागतध्यक्ष विजय कुमार राऊत, प्रा. हजारे, मनीष जैस्वाल, मसापचे डॉ. दादा गोरे, गणेश मोहिते, स सो खंडाळकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. समारोपदिनी मुलाखत, विशेष संवाद, परिसंवाद आदी साहित्यप्रकारांसह बाल साहित्यिकांचा बालकुमार मेळावा आदी कार्यक्रम सादर झाले. समाज साहित्य चित्रपट व मालिका यावर विशेष परिसंवादात अभिनेत्री चिन्मयी सुमित, गीतांजली कुलकर्णी, गणेश चंदनशिवे आणि सूत्रधार प्रेषित रुद्रवार यांनी सहभाग घेतला. तर शाहू पाटोळे यांची मुलाखत झाली. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. दानवे बोलत होते.
आ. दानवे पुढे म्हणाले, नुकतेच नरेंद्र चपळगावकर आणि प्रा. रा. रं. बोराडे सारखे दिग्गज महान साहित्यिकांचे निधन झाले. राज्यातील ही महान हस्ती आपल्यातुन निघून गेली. अशा महान राज्यात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांचे विचार प्रत्येकाला कायम प्रेरित करत राहतील अशी आशा करायला हरकत नाही. त्यांचे विचार आपल्या मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने कशाप्रकारे कशा पद्धतीने पुढे जाता येईल यासाठी असे संमेलने सातत्याने होत राहिले पाहिजे.
खऱ्या अर्थाने साहित्य हे समाजाचा आरसा असतो. समाजाच्या व्यथा मांडतात. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या, माताभगिनींच्या व्यथा साहित्य मांडत असतो, आणि या साहित्य संमेलनात या सर्वांच्या व्यथा मांडल्या गेल्या असल्याचे दिसून येते. शेतमालाचा भाव, कर्ज, महिलांवरील अत्याचार, स्थानिक विकासाचे प्रश्न या सर्वांचा विचार साहित्य करत असल्याचे दिसून येते. संमेलनात संविधानावरही चर्चा झाली. एकीकडे संविधानाचे पूजन केले जाते तर दुसरीकडे संविधानाची ‘धज्जीयां’ उडवली जाते. आज संविधानाशी या राज्यातले सरकार, देशातील सरकार खेळत असल्याची स्थिती आहे. संविधान संपवण्याची भाषा केली जात आहे. म्हणून तरुणांची जबाबदारी असावी कि येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान केवळ पाळले नाही तर ते मजबूत केले पाहिजे असा संकल्प अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होण्याची आवश्यकता असल्याचे मत विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी केले.

‘मसाप’कडून प्रत्येक साहित्याची दखल
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा साहित्य परिषदेची पार्श्वभूमी सांगत, साहित्य परिषदेचे सर्व उपक्रम जसे मराठी भाषेशी, वांग्मयाशी निगडित असतात तसेच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांशीही निगडित असते असे सांगितले. याची नोंद मसाप घेत असते. किंबहुना मसाप हे समाजात निर्मण होणाऱ्या प्रश्नांच्या शोधात असते. यावर उत्तरे शोधत असते. हे करत असताना काहींची नाराजीही घ्यावी लागते. मात्र हे करावेच लागते. आणि म्हणून संमेलनांमध्ये स्फोटक विषय चर्चिले जातात. यात जोखीमही असते. यानुसार या संमेलनामध्येही जे विषय चर्चिले गेले ते उद्बोधक असण्यासोबतच अंगावर घेण्यासारखीही होती. हे संमेलनही एका अर्थाने स्फोटकतेच्या दिशेने गेलेले असल्याचे ठाले म्हणाले.

संमेलनात एकूण ११ ठराव
या संमेलनात एकूण ११ ठराव घेण्यात आले. याचे वाचन दादा गोरे यांनी केले. या ठरावांमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा. मराठवाड्यातील रेल्वे मार्ग मध्य विभागाशी जोडण्यात यावा. कृष्णाखोऱ्यातील मराठवाड्याचे कामाचे २२ टीएमसी पाणी प्रत्येकवर्षी विनाविलंब द्यावा. आयात धोरण, शेतमालाला योग्य भाव, द्यावा. आर्थिक दुर्बल घटक शिक्षणापासून वंचित राहील असे धोरण शासनाने राबवू नये आदी ठराव घेण्यात आले.

बाल साहित्यिकांनी गाजवला बालकुमार मेळावा
मराठवाडा साहित्य संमेलनात रविवारी बालकुमार मेळावा उत्साहात संपन्न झाला.’या कोवळ्या कळ्या माजी लपले रवींद्र शिवाजी’ ह्या ग्रामगीतेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओवीची जणू प्रचितीच आली. हा मेळावा बाल साहित्यिकांच्या भन्नाट रचनांनी प्रचंड गाजला आणि या बाल साहित्यिकांची शब्द संपत्ती ऐकून उपस्थित जेष्ठ रसिकांनी भरभरून दाद दिली.
या मेळाव्यात अनेक बाल साहित्यिकांनी आपल्या कविता सादर करून उपस्थित जेष्ठ रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध साहित्यिक गेणू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध बालकवी गणेश घुले यांनी केले. श्री गुरुदेव सेवाश्रम ग्रामगीता अध्ययन केंद्र येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावर संपन्न झालेल्या या बाल मेळाव्याप्रसंगी बाल साहित्यकार श्रीपती जमाले, निशा कापडिया, विनोद सिनकर, संजय ऐलवाड, ललिता शिंदे, किरण निकम, संगीता देशमुख, आनंद पपूलवाड, भारती सोळुंके, प्रदीप इक्कर, अविनाश सोनटक्के आदि बालसाहित्यिकांची विचारपीठावर उपस्थिती होती. या संमेलनापूर्वी संपन्न झालेल्या आंतर शालेय काव्यवाचन स्पर्धेत वाळूज महानगरातील विविध शाळेतील तब्बल ६५ बालकवींनी सहभाग घेतला होता. मेळाव्याप्रसंगी प्रसिद्ध कवी संजय वरकड, बाल साहित्यकार वीरभद्र मिरेवाड (नांदेड) शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आशा डांगे मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव गणेश मोहिते, कुंडलिकराव अतकरे संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय राऊत, मच्छिंद्र सोनवणे श्री गुरुदेव सेवा मंडळ मराठवाडा प्रांत सेवा अधिकारी मनीष जयस्वाल, विठ्ठल कांबळे, पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्री कांबळे, श्री गुरुदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा हिंगणकर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव राजाभाऊ देशमुख, संचालक गजानन मानकर, नरेश देशकर, भानुदास पळसकर, ज्ञानेश्वर धुर्वे, प्रमोद देशमुख, ज्ञानेश्वर दरेकर, केशवराव बुले, प्रमोद नाल्हे, विजय रोडे, गणेश पळसकर, संजय लव्हाळे, वैशाली गवई, संयोजन समितीच्या डॉ.नीलिमा काळे, संजय वैष्णव व त्यांचे सहकारी यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरचे पदाधिकारी व सेवक तसेच बाल साहित्य रसिक व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
————-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!