पॅरा पुमसे प्रकारात महाराष्ट्रातून पदक जिंकणारा एकमेव खेळाडू

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा: छत्रपती संभाजीनगर
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या राष्ट्रीय पॅरा तायक्वान्दो स्पर्धा-2026 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या दिव्यांग खेळाडू रुद्र सुशांत पांडे याने पॅरा पुमसे प्रकारात कांस्यपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्यातून पॅरा पुमसे प्रकारात कांस्यपदक जिंकणारा रुद्र हा एकमेव खेळाडू ठरला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत रुद्रने उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर ही कामगिरी करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दिव्यांग गटातून खेळणाऱ्या रुद्रच्या यशामागे कोच संकेत व्यवहारे आणि डॉ. प्रसाद कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
रुद्रच्या या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा तायक्वान्दो संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा सानप, सचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी, रत्नदीप देशमुख, राजेश सातोनकर तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
रुद्रच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, दिव्यांग खेळाडूंसाठी त्याने प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
