पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना रोखण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या परिसराची गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा हृदयद्रावक घटना घडू नयेत, यासाठी खवड्या डोंगरावरील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री खवड्या डोंगर परिसराची पाहणी केली. यावेळी परिसरातील संवेदनशील ठिकाणे, संभाव्य धोकादायक भाग तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत पाहणी करण्यात आली.
यापूर्वीही घडल्या आहेत दुर्घटना
खवड्या डोंगर परिसरात यापूर्वीही काही तरुण-तरुणींनी डोंगरावरून उडी घेऊन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, काही प्रसंगी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून तरुण-तरुणींचे प्राण वाचवले आहेत.
या पार्श्वभूमीवर खवड्या डोंगर हा केवळ पर्यटन किंवा फिरण्यासाठीचा परिसर न राहता, सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाण म्हणून त्याकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची गरज
भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी डोंगर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता येतील, याची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. संभाव्य धोकादायक ठिकाणी सुरक्षा वाढवणे, आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करणे आणि पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्यासंदर्भात उपाययोजनांचा विचार केला जात आहे.
या पाहणीदरम्यान शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील उपस्थित होते.
चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने खवड्या डोंगरावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि पोलिसांकडून केवळ पाहणी न करता प्रत्यक्षात ठोस सुरक्षाव्यवस्था उभारली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खवड्या डोंगरावर आणखी एक जीव जाण्याची वाट न पाहता, प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!

Share Total Views: 2 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
-
मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू

Share Total Views: 3 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
-
बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपास

Share Total Views: 11 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून
