
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रोपेन व ब्युटेन वायूचा वापर केवळ घरगुती एलपीजी उत्पादनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे औद्योगिक वापरासाठी होणारा एलपीजी गॅस पुरवठा तातडीने थांबविण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१०) मसिआच्या ‘अनिल विश्वासराव चव्हाण सभागृह, मोरे चौक, वाळुज येथे मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची तातडीची बैठक पार पडली. बैठकीस विविध औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत उद्योगांना सातत्याने आणि स्थिर स्वरूपात इंधनाचा पुरवठा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. एलपीजी गॅस हा अनेक उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक असल्याने अचानक पुरवठा बंद झाल्यामुळे उद्योगांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथील उद्योगांची परिस्थिती केंद्र व राज्य शासन तसेच संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मसिआतर्फे तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून एलपीजी पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर होणारे परिणाम, उत्पादनातील अडथळे आणि पुढील काही दिवसांत निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, एलपीजी गॅससाठी पर्यायी उपाय म्हणून डिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी गॅस तसेच इतर ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्याच्या शक्यतांवर चर्चा झाली. मात्र अनेक उद्योगांची उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे एलपीजीवर आधारित असल्यामुळे तातडीने पर्यायी इंधनावर स्थलांतर करणे शक्य नसल्याचे उद्योजकांनी नमूद केले.
विशेषतः पावडर कोटींग युनिट्समध्ये एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे शहरातील काही पावडर कोटींग युनिट्स आजपासूनच बंद पडल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ही परिस्थिती कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत अशा अनेक युनिट्स बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर कामगारांचा रोजगार अवलंबून असल्यामुळे या परिस्थितीचा कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता उद्योजकांनी व्यक्त केली.
बैठकीस मसिआचे माजी अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, राहुल मोगले, सचिव सचिन गायके, कोषाध्यक्ष सर्जेराव साळुंके, कार्यकारिणी सदस्य राजेश मानधनी, अजय गांधी, जगदीश जोशी तसेच उद्योजक प्रदीप चौधरी, हरिष पठाडे, श्रीराम शिंदे, पांडुरंग विडेकर, पंकज लोया, श्याम चौधरी, मिलिंद महेंद्रकर, किरण कुलकर्णी, प्रशांत चाफळकर, अशोक आमले, अंकुश जाधव यांच्यासह एकूण ४८ उद्योजक उपस्थित होते.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
