नाशिक | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
राष्ट्रीय महामार्ग-६० वरील पिंपळगाव–मालेगाव हा उच्च-जोखीम पट्टा आता सुरक्षिततेच्या दिशेने निर्णायक वळण घेत आहे. Kotak Mahindra Prime Limited यांच्या सीएसआर उपक्रमाच्या सहकार्याने आणि SaveLIFE Foundation यांच्या पुढाकारातून या कॉरिडॉरवर बेसिक ट्रॉमा लाइफ सपोर्ट (BTLS) प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
झिरो-फॅटॅलिटी कॉरिडॉर (ZFC) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा उद्देश राष्ट्रीय महामार्ग-६० वर अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये वेळेवर आणि जीवनरक्षक उपचार मिळावेत, तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करणे हा आहे.

१० फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये आणि ११ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे प्रत्येकी ५० अशा एकूण १०० प्रथम प्रतिसादकर्ते व अंमलबजावणी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे क्रिटिकल कॉरिडॉर पोलिस पथकांची जीवनरक्षक कौशल्ये अधिक भक्कम झाली आहेत.
कोटक महिंद्रा प्राइमचे पूर्णवेळ संचालक सूरज राजप्पन यांनी सांगितले की, “सुरक्षित समुदाय निर्माण करणे हे आमच्या सीएसआर व्हिजनचे केंद्र आहे. प्रथम प्रतिसादकर्त्यांना प्रशिक्षण देणे म्हणजे थेट जीव वाचवण्याचे कार्य असून हे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा प्राधान्ये आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत आहे.”
सेव्हलाइफ फाउंडेशनचे संस्थापक व सीईओ पियुष तिवारी यांनी स्पष्ट केले की, “अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यास टाळता येण्याजोगे मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. BTLS प्रशिक्षणामुळे प्रथम प्रतिसादकर्ते निर्णायक क्षणी योग्य कृती करण्यास सज्ज होतात.”

ब्लॅकस्पॉटवर शून्य मृत्यू – ठोस यश
नाशिक ग्रामीण हद्दीतील पिंपळगाव–मालेगाव दरम्यानच्या १२० किमी महामार्गावर ओळखल्या गेलेल्या ब्लॅकस्पॉटवर या उपक्रमाचा मोजता येण्याजोगा परिणाम दिसून आला आहे. उमराणे गावातील अतिजोखीम ठिकाणी २०२२–२३ दरम्यान १३ प्राणघातक अपघातांत ८ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, ऑगस्ट २०२४ पासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकही मृत्यू झाला नाही, हे विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
प्रशिक्षणातील प्रमुख मुद्दे
या BTLS प्रशिक्षणात
- सीपीआर
- रक्तस्त्राव नियंत्रण
- मणक्याचे (C-Spine) स्थिरीकरण
- वायुमार्ग व्यवस्थापन
- घटनास्थळी सुरक्षा व प्राथमिक मूल्यांकन
- ‘गुड समॅरिटन कायदा’ व ‘गोल्डन अवर’चे महत्त्व
यांचा सखोल सराव व माहिती देण्यात आली.
आजपर्यंत सेव्हलाइफ फाउंडेशनने देशभरात २६ हजारांहून अधिक प्रथम प्रतिसादकर्त्यांना प्रशिक्षण दिले असून, उच्च-जोखीम महामार्गांवरील अपघातमृत्यू कमी करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.
पिंपळगाव–मालेगाव पट्ट्यावर राबविण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण नव्हे, तर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने ‘जीव वाचवणारी क्रांती’ ठरत आहे.
