July 7, 2025
46c0a3b5-4999-40e5-b5fc-8f3b5960fbde-1.jpg

सिडकोचा हलगर्जीपणा! आषाढी एकादशी दोन दिवसावर, तरीही रस्त्यावरील खड्डे तसेच…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

वाळूज महानगर, दि. ४ जुलै – आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांची पावलं पंढरपूरला वळणार असताना, अद्यापही मुख्य रस्त्यावरील खड्डे व कचरा तसेच आहेत. बजाजनगर – मोहतादेवीमार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर खड्ड्यांसह कचऱ्याचे साम्राज्य असून, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. यामुळे या मार्गाने जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिनांक ३ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित बैठकीत आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेसंबंधी सूचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

भाविकांची वर्दळ लक्षात घेता, रस्त्यांची तातडीने डागडुजी, खड्डे बुजविणे, कचरा हटविणे आवश्यक असतानाही प्रशासनाचा दिरंगाईचा कारभार सुरु आहे. सिडको प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, की या कामांसाठी ठोस योजना आहे का, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भाविकांच्या सोयीसाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


error: Content is protected !!