July 7, 2025
b9c3fc65-7ff2-4a79-8283-25e0ff528892

वाळूज महानगर (प्रतिनिधी) : संदीप लोखंडे –
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करून एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. समाजातील विविध घटकांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमात माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकार बांधवांच्या मुलांनी यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले. विविध बोर्ड परीक्षांमध्ये तसेच स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणात चमकदार कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींना गौरविण्यात आले. यात पल्लवी रामराव भराड, अमृता शिवाजी बोडखे, आर्या संजय निकम, चैताली रवी गाडेकर, सायली माधव कवरखे, युवराज किशोर बोचरे, नंदिनी सुदाम गायकवाड यांचा समावेश होता.

गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “शिक्षण हीच खरी शक्ती असून, यश मिळवण्यासाठी प्रामाणिक मेहनतीला पर्याय नाही. पत्रकारिता हे क्षेत्र जनतेसाठी अत्यंत जबाबदारीचं आहे, आणि त्याच पत्रकारांच्या मुलांनी केलेली ही कामगिरी समाजासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.”

त्यांच्यासोबतच सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “अभ्यासाबरोबरच उत्तम नागरिक म्हणून घडणंही तितकंच महत्त्वाचं आहे,” असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, गणेश गिरी, संदीप काळे, सलीम शेख यांच्यासह आदी पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व पत्रकार बांधव, पालक आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांच्या चेहऱ्यावर आपल्या पाल्याच्या गौरवाने अभिमानाचे भाव स्पष्ट दिसत होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करत त्यांचे आभार मानले.

वाळूज पोलिसांनी राबवलेल्या या अभिनव उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होणार असून, हा उपक्रम इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!