

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर | आषाढी एकादशी निमित्त ६ जुलै रोजी पंढरपूर येथे १३ ते १४ लाख भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने, यासाठीची नियोजन बैठक आज दि १७ जून रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पवार होते. भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी प्रशासन, पोलीस, आरोग्य व विविध यंत्रणांनी एकत्र येत व्यापक नियोजन आखले.
दर्शनासाठी विशेष व्यवस्था:
- मंदिराकडे येणारे रस्ते बंद राहणार असून, ओयसिस चौक ते मंदिरापर्यंत दर्शन रांगा लावण्यात येतील.
- दिंडीसाठी स्वतंत्र रांग, तीन प्रकारची दर्शन व्यवस्था व दोन आपत्कालीन मार्ग उपलब्ध असतील.
- पास व्यवस्थाही लागू केली जाणार आहे.
- नारळ, फुले व पान मंदिरात नेण्यास बंदी राहील.
पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा:
- विविध संस्थांकडून पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार.
- सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व डॉक्टरांची टीम तैनात राहणार.
- पादत्राणे ठेवण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत असतील.
- परिसरातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी विशेष विनंती करण्यात आली आहे

बंदोबस्त व सुरक्षा उपाय:
पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे म्हणाले की, “भाविकांची संख्या वाढत असल्याने पोलीस स्टाफ वाढवण्यात येणार आहे. ओयसिस चौक ते मंदिर मार्गावर बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली आहे, कारण त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना अडथळा येतो.”
- अग्निशमन व रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत.
- दिंडीत इतर भाविक घुसणार नाहीत याची पोलिसांकडून दक्षता.
- स्टेज वाढवण्यात येणार असून, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम केली जाणार.
- लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सूचना प्रसारित केल्या जातील.

वाहतूक नियोजन:
पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले की, “कामगार चौक ते ओयसिस चौक आणि ए एस क्लब ते मोर चौक मार्ग बंद असणार आहेत.
शहरातून येणारी मोठी वाहने तिसगाव चौफुली व ईसरवाडी फाटा येथे वळवण्यात येणार आहेत. सर्वत्र मजबूत बॅरिकेडिंग केली जाईल. रस्त्यावर अनधिकृत दुकाने बसवू दिली जाणार नाही.”
अपंग आणि वयोवृद्धांसाठी सुविधा:
सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांनी सांगितले की, “१० ते १२ लाख भाविकांची उपस्थिती लक्षात घेता मजबूत बॅरिकेडिंग व लाऊडस्पीकर व्यवस्था ठेवली जाणार आहे. अपंग बांधवांचा विशेष विचार करण्यात येईल.”
उपस्थित मान्यवर:
या बैठकीला पोलीस, अग्निशमन, महावितरण, आरोग्य, सिडको, एमआयडीसी, मंदिर नियोजन समिती, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
