वाळूज महानगर : नऊ दिवस चालणाऱ्या रास दांडियात गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून महिला-मुलींची छेड काढणे, कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रास दांडियात अधिकचा बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
औद्योगिक रहिवासी परिसरात अनेक ठिकाणी सार्वजनिक रास दांडियाचे आयोजन केले जाते. मागील काही वर्षांमध्ये महिलांना आलेल्या वाईट अनुभवांवरून यंदा पोलिस प्रशासनाने पेट्रोलिंग करावी, रास दांडियामध्ये मद्यप्राशन करून कोणीही घुसणार नाही याची काळजी घ्यावी, आधार कार्डशिवाय दांडिया खेळण्यासाठी तरुणांना प्रवेश देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. स्वयंसेवक तैनात करावेत पोलिसांनी स्वयंसेवक आणि पोलिस मित्रांना मदतीला घेऊन प्रत्येक रास दांडियाच्या ठिकाणी त्यांना तैनात करावे. त्यामध्ये पुरुषांसोबतच महिला पोलिस मित्र व स्वयंसेवकांचा समावेश करावा, अशी सूचना पो.नि. कृष्णा शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शिवसेना शहरप्रमुख सागर शिंदे, उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे, विभागप्रमुख विनोद दाभाडे, अंबादास गुंजाळ, वीरेंद्र जैस्वाल, अजहर पटेल, दिनेश लोंढे यांनी केली आहे.