img_0992-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : संदीप लोखंडे

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू असतानाचके बजाजनगरातील मोरे चौकात एका दुकानदाराच्या आकर्षक ऑफरमुळे मोठा गोंधळ उडाला. अवघ्या एक रुपयात शर्ट मिळणार असल्याच्या व्हायरल रील्समुळे हजारो नागरिकांनी दुकानाबाहेर एकच गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला.

दुकानदाराने दोन शर्ट खरेदी केल्यानंतर तिसरा शर्ट केवळ एक रुपयात मिळणार, अशी ऑफर दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, सोशल मीडियावर केवळ एक रुपयात शर्ट मिळणार असल्याच्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यामुळे ऑफरची संपूर्ण माहिती न घेता नागरिकांनी दुकानाबाहेर गर्दी केली. पाहता पाहता हजारो ग्राहक जमा झाल्याने परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रकाश वाघ, समाधान पाटील, सतीश पवार, लखन खंडारे, नितीन इनामे आणि सूरज अग्रवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गर्दी पांगवली.

दरम्यान, संबंधित दुकानदाराला नोटीस देऊन समज देण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे यांनी सांगितले. यापुढे अशा आकर्षक ऑफरमुळे दुकानासमोर अनावश्यक गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सना बळी न पडता त्यामागील अटी व शर्तींची पूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतरच खरेदी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

॰॰॰॰