May 17, 2026
15df8ecf-e4b0-4aeb-92dc-9e586479ef63

“आपण केलेल्या कर्माची जमापुंजी म्हणजेच आयुष्याचं खरं ओरिजनल सर्टिफिकेट…!”

“जगावं इतकं छान की फुलांनाही हेवा वाटावा… विचारांचे मधुकण घेण्यासाठी फुलपाखरांनीही हातात हात मिळवावा…!”

माणसाचं आयुष्य हे नात्यांनी, संस्कारांनी आणि कर्मांनी घडत असतं. आयुष्याच्या पुस्तकात जर आपल्याला नात्यांची सुंदर अक्षरं कोरायची असतील, तर झाडाकडून एक गोष्ट नक्की शिकली पाहिजे. झाडाच्या मुळावर घाव बसला की फांद्या आपोआप सुकतात. त्याचप्रमाणे नात्यांच्या मुळात जर विश्वास, प्रेम आणि आपुलकी नसेल तर नात्यांचं अस्तित्व टिकत नाही.

माणूस आयुष्यभर कष्ट करून मोठं घर बांधतो. त्या घराला “आपलं घर” म्हणतो. पण केवळ चार भिंती उभ्या राहिल्या म्हणून घर तयार होत नाही; त्या भिंतींमध्ये राहणाऱ्या माणसांच्या भावना, प्रेम, आदर आणि समजूतदारपणामुळेच त्या जागेला घरपण मिळतं. चिमणीचं छोटंसं घरटंही सुंदर असतं; तिने कुठे वास्तुशास्त्राचे धडे घेतलेले असतात? तरीही त्या घरट्यात माया असते, आपुलकी असते.

लहानपणी आई-वडील आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, वाढवतात, घडवतात. मग त्यांच्या उतारवयात त्यांची काळजी घेणं, त्यांना आधार देणं हे मुलांचं कर्तव्य नाही का? आई-वडिलांच्या ऋणातून पूर्णपणे मुक्त होणं शक्य नसतं, पण कृतज्ञतेने त्यांची सेवा करणं हीच खरी संस्कृती आहे.

म्हणूनच एका कवीनं किती सुंदर ओळी लिहिल्या आहेत —

“नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची,
ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची…!”

घरात मतभेद असू शकतात, पण मनभेद मात्र नसावेत. स्वार्थासाठी नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ देऊ नये.

भगवंताने प्रत्येक माणसाला गुण आणि दोषांसह या जगात पाठवलं आहे. म्हणून प्रत्येकामधील चांगुलपणा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सद्गुणांची बेरीज आणि दुर्गुणांची वजाबाकी करत आयुष्यात पुढे चालत राहिलं पाहिजे. कारण अंधार कितीही गडद असला तरी एक छोटीशी पणती त्यावर मात करू शकते.

आपण आयुष्यभर इतरांच्या चुका शोधण्यातच वेळ वाया घालवतो; पण तोच वेळ जर स्वतःच्या चुका सुधारण्यात घातला तर आयुष्य अधिक सुंदर होईल.

माणसाने पद, प्रतिष्ठा, सत्ता किंवा संपत्तीचा कधीही गर्व करू नये. कारण या गोष्टी कायमस्वरूपी नसतात. देवाने सगळ्यांना एकाच मातीपासून घडवलं आहे. फरक एवढाच की कोणी बाहेरून सुंदर दिसतो, तर कोणी मनाने सुंदर असतो.

समुद्राकडूनही माणसाने खूप काही शिकावं —
“भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही.”

इंग्रजीतील एक म्हण याच गोष्टीची जाणीव करून देते —

“When money is lost, nothing is lost;
when health is lost, something is lost;
but when character is lost, everything is lost.”

आज आपल्या चेहऱ्यावर अनेक दिखावे आणि मुखवटे असतात. पण ते बाजूला ठेवले की प्रत्येक माणूस सारखाच असतो. शिक्षण, पदवी, संपत्ती किंवा विद्वत्ता याला तेंव्हाच अर्थ असतो, जेव्हा माणसाला माणुसकी ओळखता येते.

जीवनाच्या प्रवासात यश-अपयश, सुख-दुःख, चढ-उतार येतच राहतात. कुणीच परिपूर्ण नसतं. म्हणून गुण-दोषांसह एकमेकांना स्वीकारणं आणि समजून घेणं, हीच खरी समजदारी आहे.

शेवटी आपल्या हातातली डिग्री, पैसा, पद किंवा प्रतिष्ठा आपल्यासोबत जात नाही. आपण आयुष्यभर कुणाशी कसं वागलो, कुणाला आनंद दिला, कुणाच्या मदतीला धावलो, निस्वार्थपणे कुणासाठी उभे राहिलो — हीच खरी कर्माची शिदोरी आपल्या सोबत राहते.

आणि म्हणूनच…
“आपण केलेली चांगली कर्मं हेच तर आपल्या आयुष्याचं खरं सर्टिफिकेट असतं.”

जर आयुष्यात माणसं आणि चांगली कर्मं कमावली नाहीत, तर ते आयुष्य व्यर्थ गेलं असंच म्हणावं लागेल.

— श्री. निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे (कारेगावकर)
छत्रपती संभाजीनगर

॰॰॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!